
‘भारतरत्न’ श्रीमती लता मंगेशकर दि. 28 सप्टेंबर 2019 रोजी नव्वद वर्षे पूर्ण करीत आहेत… त्यानिमित्ताने लतादीदींच्या नऊ दशकांच्या सुरेल कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘लता’ हा ग्रंथ ‘जीवनगाणी-सांजशकुन’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. या आगामी ग्रंथातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘मूर्तिमंत सरस्वती’ हा अमरेंद्र धनेश्वर यांनी शब्दांकन केलेला लेख…
सरस्वती वंदनेतील ही शेवटची ओळ ओठी आली म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती लता मंगेशकर! अर्थात तुम्हा-आम्हा सर्वांची आवडती लतादीदी! लता माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. पूर्वीपासून मी तिला सर्वांप्रमाणे ‘दीदी’ म्हणूनच हाक मारत आलो. मंगेशकर कुटुंबाचे आणि पुरंदरे कुटुंबाचे संबंध फार जुने आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा मी मोठा चाहता. दीनानाथांना अकाली मृत्यू आल्याने त्यांचा फारसा सहवास मला लाभला नाही. मात्र त्यांच्या पश्चात माई मंगेशकर आणि त्यांची पाचही मुले यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला हे माझं भाग्य.
खूप जुनी गोष्ट आहे. पेडर रोड येथील मंगेशकरांच्या घरी मी एके दिवशी गेलो होतो. दीदी आतल्या खोलीत बसलेली होती. बराच वेळ होऊनही ती दिसेना म्हणून मी माईंना विचारलं, ‘दीदी कुठाय?’ त्यावर माई म्हणाल्या, ‘ती आत एकटी बसली आहे. बराच वेळ झाला. जेवली नाही, की काही खाल्लं नाही. नुसती सुन्न बसून आहे.’ मी कारण विचारलं तशा माई म्हणाल्या, ‘कुठल्याशा वृत्तपत्रात तिच्याविषयी काही उलट-सुलट मजकूर छापून आलाय. त्यामुळं ती खिन्न झाली आहे.’ हे ऐकताच ‘त्यात काय एवढं!’ म्हणत मी तिला बाहेर बोलावून घेतलं. सर्वप्रथम तिला म्हटलं, ‘दीदी, आधी तू जेवण कर. मग बोलू या.’ मी तिला आग्रहानं जेवायला बसवलं. मीही तिच्यासोबत जेवलो. जेवता-जेवता मी तिला म्हटलं, ‘हे पहा दीदी, खोटी निंदा आणि खोटी स्तुती या दोन गोष्टींकडे फार लक्ष देऊ नको. या गोष्टी सरळ दुर्लक्ष करण्याजोग्या आहेत.’ त्यानंतर दीदीसोबत माझा मोकळेपणानं संवाद झाला. अर्थात माझ्या सांगण्यामुळं नव्हे, तर तिच्या व्रतस्थ स्वभावामुळं प्रत्येक अडचणीच्या प्रसंगाला ती निधडेपणानं सामोरी गेली.
‘भारतरत्न’ श्रीमती लता मंगेशकर दि. 28 सप्टेंबर 2019 रोजी नव्वद वर्षे पूर्ण करीत आहेत. त्या निमित्ताने लतादीदींच्या गायन कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘लता 90’ हा कार्यक्रम ‘जीवनगाणी’ संस्थेच्या वतीने सादर केला जाणार आहे. रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे दुपारी 12 ते रात्रौ 12 वाजेपर्यंत रंगणाऱया या आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे लतादीदींना आजच्या प्रथितयश गायकांकडून 91 बहारदार गाण्यांची अनोखी सुरवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये लतादीदींची गाजलेली 40 मराठी तसेच 51 हिंदी (सोलो) गाणी सादर करण्यात येतील. त्यासोबतच, ‘लता 90’ कार्यक्रमांतर्गत पं. हृदयनाथ मंगेशकर ‘लतादीदी आणि मी’ हा कार्यक्रम सादर करीत असून त्यानंतर लतादीदींच्या नऊ दशकांच्या सुरेल कारकीर्दीचा आढावा घेणाऱया ‘लता’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. अनेक दिग्गज मान्यवरांचे लतादीदींविषयीचे लेख हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्टय़ असून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ‘जीवनगाणी’ यांचे असून व्हॅल्युएबल ग्रुप यांची ही प्रस्तुती आहे.
लतादीदी ही एक व्रतस्थ योगिनी आहे. संगीत हाच तिचा ध्यास-विषय आहे. ती साक्षात सरस्वती आहे. दीदीच्या आईचं म्हणजे माईंचं मूळ नाव सरस्वती होतं. माझ्या आईचं नावही सरस्वती होतं. त्या अर्थानं आम्ही सगळी सरस्वतीचीच मुलं आहोत याचा मला अभिमान वाटतो.
मी दीदीला दिलासा दिला त्याची परतफेड तिनं कशी केली, तीही आठवण सांगण्यासारखी आहे. एकदा मी तिच्या घरी गेलो होतो. माईंशी गप्पा सुरू होत्या. माईंना दीनानाथांप्रमाणेच ज्योतिषविद्येची आवड होती. हात बघून त्या भविष्य सांगत असत. बोलता बोलता सहज माझा हात बघून त्या म्हणाल्या, ‘तुमचं जीवन खडतर असणार आहे. काही संकटं तुमच्यावर येतील. कदाचित काही बदनामीचे प्रसंग ओढवतील!’ एवढं बोलून त्या आत निघून गेल्या. मी विचारमग्न झालो. एकटाच बसून राहिलो हे ध्यानात आल्यानंतर दीदी माझ्याजवळ येत म्हणाली, ‘काय झालं बाबासाहेब, तुम्ही असे गंभीर का?’ त्यावर माईंनी वर्तवलेलं भविष्य मी तिच्या कानावर घातलं तेव्हा ती म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही चिंता करू नका. जे ‘नामी’ असतात त्यांनाच बदनामीची भीती असते.’ त्या वाक्यानं मी निर्धास्त झालो.
लतामध्ये अनेक गुण आहेत, पण माझ्या मते प्रखर जिद्द हा तिचा सर्वात मोठा गुण आहे. या जिद्दीतूनच आज केवळ महाराष्ट्राला नव्हे तर सबंध हिंदुस्थानला तिच्या रूपानं केवढी मोठी देणगी लाभली आहे! दीदीचं नाव आज भारतवर्षात कोणत्या स्तराला पोहोचलंय हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तिच्या प्रशंसेसाठी आजवर शब्दकोशातील सगळी विशेषणं वापरून झाली असतील यात शंका नाही. कुणी तिला ‘गानकोकिळा’ म्हणतं, कुणी ‘देवकन्या’ असं संबोधतं.
दीदी आज नव्वद वर्षांची होत आहे. या निमित्तानं मी वयाचा फायदा घेऊन आणि मंगेशकर व पुरंदरे घराण्यांचं जिव्हाळ्याचं नातं लक्षात घेऊन दीदीला मनापासून आशीर्वाद देतो, ‘दीदी, तुम्ही शतायुषीच काय त्यापेक्षाही आयुष्यमान व्हा! खूप खूप उदंड यश मिळवा! ‘भारतरत्न’ तर तुम्ही आहातच, पण त्याही पलीकडे जाऊन, आकाशातल्या ताऱयांसारखे काही किताब असतील तर तेही तुम्हांस लाभावेत. मंगेशकर घराण्याला जी समृद्धी लाभली ती नव्या पिढीलाही लाभावी अशी प्रार्थना शांतादुर्गा आणि तुळजाभवानी या दोघींच्याही चरणी मी करतो.
शब्दांकन – सुनील देशपांडे





























































