मराठी गीतांची लता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय कुलकर्णी

लताजींच्या मराठी गीतांचा आपण जेव्हा विचार करू लागतो तेव्हा त्यांनी वसंत प्रभूंकडे गायलेल्या गीतांना प्रामुख्याने आठवू लागतो. एकीकडे ‘आशा भोसले-गदिमा-सुधीर फडके’ हे त्रिकूट रसिकांना प्रतिभेचे नवनवे आविष्कार देत होते आणि दुसरीकडे ‘लता-पी. सावळाराम-वसंत प्रभू’ हे त्रिकूट रसिकांच्या भावभावनांचे विश्व हळुवारपणे फुलवत होते. तमाम मराठी रसिकांचे भावविश्व या गीतांनी समृद्ध बनलं.

लताजींच्या गायनाचा शुभारंभ मराठी संगीतकाराकडेच झाला. तो काळ मोठा विलक्षण होता. देशात स्वातंत्र्यलढय़ाचा अपूर्व उत्साह खळाळत होता. जगात दुसऱया महायुद्धाने थैमान घातले होते. सांस्कृतिक विश्वात याचं प्रतिबिंब उमटणं स्वाभाविकच होतं. पुढे फाळणीची वेदना कळ देऊन गेली. मराठी सांस्कृतिक विश्वात त्यावेळी भावगीतांचा जमाना होता. भावगीतांचा बादशहा गजानन वाटवे तेव्हा आपल्या गायकीने रसिकांच्या दिलात अढळ स्थान मांडून होते. याच काळात बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे, माणिक वर्मा, सरोज वेलिंगकर, सुधीर फडके ही मंडळी जनतेच्या समोर होती. वाटव्यांच्या भावगीतांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती आणि याच काळात लताजींचा स्वर्णस्पर्शी स्वर रसिकांपुढे आला आणि स्वरानंदाचा अभिषेक सुरू झाला. गेली 60-65 वर्षे या स्वराने आम्हाला नवरसाची प्रचीती देणाऱया गीतांची अनुभूती दिली. या स्वराने आम्हाला जगण्याचा अर्थ दिला व आमचं जीवन रसिलं/सुरीलं बनवलं. या त्रयीची आठवण काढली की, डोळय़ांपुढे येते ‘गंगा-यमुना डोळय़ांत उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीत ! 1949 सालचं हे गाणं आजही पापण्यांच्या कडा ओलावते. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला’ या गीतातील लताच्या स्वरातील कातरता तिचं पितृप्रेम व्यक्त करते. या त्रयीने हर तऱहेचे, प्रत्येक भावनांचे, प्रत्येक रसाचे गाणे दिले. लताजींच्या कोवळय़ा स्वरातील ‘हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील कां ?’, ‘नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते’ या गीतातील कोवळय़ा प्रेमाच्या अंकुराची नाजुकता लताजींनी लीलया टिपली आहे. त्या काळातील प्रेमातील मुग्धता, त्यातील कोवळीक आणि मुख्य म्हणजे ‘लज्जा’ हा जेव्हा स्त्रियांचा मुख्य अलंकार होता त्या काळातली प्रेमाची आर्तता या साऱयात एक नादमय गोडवा होता अन् या गोडव्याचाच प्रत्यय ठायीठायी येतो.

‘मधु मागसी माझ्या सख्या परी’, ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’, ‘सप्तपदीही रोज चालते’ या भावगीतांनी तमाम तरुण-तरुणींचे भावविश्व गुलाबी झाले. वसंत प्रभूंनी स्वरसाज चढवताना कधीही सूरांना शब्दांवर आक्रमण करू दिलं नाही. त्यामुळेच आज इतक्या वर्षांनंतरही भावगीतं लख्ख आठवतात! लताजींनी वसंत प्रभूंकडे बरीचशी भक्तिगीतंही गायलीत. ‘आठवायला गेलं तर लताजींची चिक्कार मराठी गाणी मनाचे फेर धरून नाचू लागतात. त्यात ज्ञानदेवांपासून भा. रा. तांबेंपर्यंत, कुसुमाग्रज, वसंत बापट यांच्यापासून थेट सुधीर मोघेंपर्यंतची गाणी असतात. या मराठी गीतांनी तमाम मराठी रसिक सुखावला. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हे खळय़ांकडचं गाणं! त्यातील आर्तता व हार्मोनियमच्या सूराने गीताशी जमवलेली समरूपता सारंच अलौकिक दिव्य! बालकवींच्या लेखणीतून उतरलेले ‘माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे, अक्षय गाणे अभंग गाणे हे गाणे’ हे गीत ऐकल्यावर ते लताजींच्या स्वराबाबातच लिहिलंय की काय असा भास होतो. दैव जाणिले कुणी, धुंद मधुमती रात रे रात रे ही गदिमांची गाणी, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीलं कार्य काय’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘कशी काळ नागिणी सखे गं वैरीण झाली नदी’ ही भा. रा. तांबेंची गाणी आजही मनाला सुखावून जातात. भावगीतातील प्रत्येक शब्दाला लताच्या स्वराने चिरंजीव केले. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘राजा सारंगा माझ्या सारंगा’, ‘सावर रे सावर रे’, ‘गुणी बाळ कसा जागसी कारे’, ‘सांग कधी कळणार तुला’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’, ‘गगन सदन तेजोमय’, ‘वादळं वारं सुटलं गं’, ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं’, ‘मोगरा फुलला’ या गीतांवर गेल्या चार पिढय़ा पोसल्या आहेत. लताजींच्या मराठी गीतातून दिसणारी सात्विकता, पारदर्शकता, सारे मनाला परमतत्त्वाला जवळ नेणारी दिसतात.

(लेखक मुक्त पत्रकार व चित्रपट अभ्यासक आहेत.)