धुळ्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पहिल्या दिवशी 43 उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होताच इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली. धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पहिल्या दिवशी 43 उमेदवारी अर्जाचे वितरण झाले. त्यात धुळे शहरात 14, धुळे ग्रामीण मध्ये 17, शिंदखेड्यात 11, तर शिरपूर मतदारसंघासाठी एक अर्ज वितरित झाला. साक्री विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही अर्ज वितरित झाला नाही. अर्ज वितरण आणि उमेदवारांकडून स्वीकारण्याची प्रक्रिया चार ऑक्टोबरला दुपारी 3 पर्यंत राबविली जाणार आहे.

धुळे शहरातून उमेदवारी करण्यासाठी पहिल्या दिवशी 11 तर धुळे ग्रामीणमधून 16 अर्ज वितरित झाले. महापालिकेच्या जुन्या इमारतीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये रणजीत भोसले, शंकरराव थोरात, सलिम शेख, अशोक शंकर पाटील यांचा समावेश होता.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 17 उमेदवारी अर्ज वितरित झाले. मावळते आमदार कुणाल पाटील यांच्यासाठी संदीप शिवराम परदेशी यांनी चार अर्ज घेतले. याशिवाय किरण शिंदे यांच्यासाठी विलास पवार यांनी चार अर्ज घेतले. तसेच स्वतःसाठी इतरांनीदेखील स्वतःसाठी अर्ज घेतले. त्यात संतोष मासुळे, जगन्नाथ बैसाणे, भाऊसाहेब पवार, अरुण पाटोळे यांचा समावेश आहे. प्रशासनातर्फे त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातून 4 ऑक्टोबरला दुपारी 3 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दिले जाणार आहेत आणि इच्छुकांकडून स्वीकारले जाणार आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 11 तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात एक अर्ज वितरित झाला. साक्री विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी अर्ज घेण्यासाठी एकही इच्छुक फिरकला नाही. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीत भेट देऊन पाहणी केली.