
‘जर अजित पवार व शरद पवार यांच्यातील मतभेद दूर झाले नाही तर अजित पवार वेगळा पक्ष स्थापन करतील’, असे भाकीत भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यामागे शरद पवार यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हे कारण नसून दुसरेच कारण असल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शुक्रवारी एकाएकी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व अजित पवार यांचे काका शरद पवार यांना देखील काहीच कल्पना नव्हती. याबाबत बोलताना संजय काकडे म्हणाले, ‘अजित पवार हे राजकारण असे एकाएकी सोडतील अशा प्रकारचे नेते नाहीत. त्यांना जे हवे आहे ते जर त्यांना मिळाले नाही. तर ते थेट वेगळा पक्ष स्थापन करतील किंवा मग कुठल्या तरी पक्षासोबत युती करून निवडणूक लढवतील.’
यावेळी काकडे यांनी अजित पवार यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला तर त्याचा पक्षाला जबरदस्त फटका बसू शकतो असे देखील सांगितले. ‘जर अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडली तर शरद पवार यांच्या पक्षाला या विधानसभा निवडणूकीत जबरदस्त फटका बसेल व त्यांच्या जागा तब्बल अर्ध्याहून कमी होतील’, असे काकडे यांनी सांगितले.




























































