टी-20 मध्ये विक्रमी खेळीची नोंद, एकाच डावात ठोकले 20 चौकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रविवारी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीमध्ये बेथ मूनी हिने 61 चेंडूत 113 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने तब्बल 20 वेळा चेंडू सीमापार धाडला. एकाच डावामध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम तिच्या नावावर जमा झाला आहे.

बेथ मूनी हिच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांमध्ये 4 बाद 217 धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे मून हिने फक्त 54 चेंडूमध्ये शतकाला गवसणी घातली. या खेळीदरम्यान तिने एकही षटकार लगावला नाही, मात्र चौकारांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाच्या पहाडाएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेची कर्णधार सी अट्टापटूटू हिनेही 113 धावांची शतकी खेळी केली परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

स्वत:चाच विक्रम तोडला
महिला टी-20 क्रिकेटमध्ये बेथ मूनी हिने आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध 21 नोव्हेंबर, 2017 ला टी-20 लढतीत तिने 19 चौकार ठोकले होते. लंकेविरुद्ध 20 चौकार ठोकत तिने आपला जुना विक्रम सुधारला आहे. तसेच एकही षटकार न ठोकता शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू आहे.