आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी धडपड, रिझर्व्ह बँकेच्या 30 हजार कोटींवर केंद्राचा डोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rbi-1

केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना घसरलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा आरबीआयकडे हात पसरणार आहे. आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारला आरबीआयकडून पुन्हा 30 हजार कोटी हवे आहेत. हे पैसे लाभांशाच्या (अंतरिम डिव्हिडेंड) स्वरूपात आहेत. अर्थव्यवस्थेची घडी सावरण्यासाठी गेल्या तीन वर्षांत केंद्राने आरबीआयकडून कोट्यवधी रुपयांचा लाभांश घेतला आहे.

केंद्र सरकारने राबवलेली आर्थिक धोरणे फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात सगळ्याच क्षेत्रात मंदी आहे. वाहन, बांधकाम क्षेत्रे कोलमडली आहेत. देशाचा आर्थिक विकास दर 5 टक्क्यांपर्यंत पोहोचला. बेरोजगारीच्या दरात 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. गेल्या 45 वर्षांतील ही सगळ्यात मोठी वाढ आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कॉर्पोरेट करात 10 टक्क्यांनी कपात केली. त्याचा उद्योगांवर चांगला परिणाम दिसू लागला असतानाच आता आणखी एक पाऊल टाकत केंद्र सरकार आरबीआयला तिजोरीतील 30 हजार कोटींची थैली मोकळी करण्यास सांगणार आहे.

आरबीआय सरकारला देणार 1 लाख 76 हजार 51 कोटी

शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या केंद्रीय बोर्डाने गेल्या महिन्यात सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी रुपये देण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने 1 लाख 23 हजार 414 कोटींतील 28 हजार कोटींची रक्कम मार्च 2019 ला केंद्राला दिली आहे.

  • आर्थिक वर्ष 2017-18मध्ये केंद्र सरकारने 10 हजार कोटी घेतले.
  • आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये केंद्राने 28 हजार कोटी घेतले.
  • आर्थिक वर्ष 2019-20मध्ये केंद्राला 30 हजार कोटी हवे आहेत. ही मागणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे.
  • याबरोबरच खासगीकरणातून उभा राहणारा निधी आणि राष्ट्रीय लघु बचत निधीचा (एनएसएसएफ) वापरही केंद्र सरकार अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करणार आहे.