
बेस्टच्या ताफ्यात हळूहळू प्रदूषण हटविण्यास मदत करणार्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. मात्र, या बसेसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी शहरात चार्जिंग पॉइंट उभारताना ते विजेसह सौर ऊर्जा, हरित ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जेवर चालणारे असावेत अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे बेस्ट प्रशासनाकडूनही त्याच्या अंमलबजावणीचे लागलीच प्रयत्न केले जाणार आहेत.
बेस्ट समितीच्या बैठकीत इलेक्ट्रिक बस ताफ्यात आणल्याच्या पार्श्वभूमीसाठी त्यांच्या चार्जिंगसाठी देखील पर्यावरणपूरक पर्याय वापरले जावे या मागणीवर नुकतीच चर्चा झाली. त्यावेळी इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्जिंगसाठी विद्युतसेवेप्रमाणेच सौर आणि हरित ऊर्जेचा वापर करण्याची मागणी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली. त्यावर बेस्ट समितीची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी होणार आहे. प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी पुन्हा कोळशावर तयार केलेली वीज वापरण्यात काय हशील असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या इलेक्ट्रिक बसेसच्या उद्घाटनप्रसंगी केला होता. त्यामुळे बेस्ट समितीच्या बैठकीतही हाच मुद्दा सदस्य कोकीळ यांनी मांडला. त्यासंदर्भात कोकीळ यांनी प्रशासनास पत्रही पाठविले आहे. त्यावर इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी उभारण्यात येणार्या चार्जिंग स्टेशनवर सौर, हरित ऊर्जेचा वापर करण्याविषयी प्रशासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे म्हटले जात आहे.






















































