गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘दीदी और मै’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल सात दशकांच्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीत व्यग्र शेड्युलमुळे बालपणीच्या अनेक आठवणी धूसर झाल्या होत्या. परंतु, ‘दीदी और मै’ या पुस्तकामुळे बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्याची भावना गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचे आत्मवृत्त गतवर्षी प्रकाशित झाले होते. त्याचा हिंदी अनुवाद ‘दीदी और मै’चे प्रकाशन रविवारी लतादीदींच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लतादीदींच्या हस्ते प्रभुकुंज निवासस्थानी घरगुती समारंभात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मीना खडीकर यांच्या 2018 साली प्रकाशित झालेल्या ‘मोठी तिची सावली’ पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘दीदी और मै’ हा त्याचा हिंदी अनुवाद आहे. दीदी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक कार्यक्रमात मीनाताईंचा सहभाग होता. अनेक हिंदी सिनेमांतही त्यांनी दीदींसोबत पार्श्वगायन केले आहे. ‘दीदी और मैं’ या पुस्तकात मीनाताईंनी लतादीदींच्या उज्ज्वल कारकीर्दीचा समग्र आलेख आपल्या रसाळ शैलीत मांडलाय. दीदींशी निगडित अनेक अविस्मरणीय आठवणी आणि मंगेशकर कुटुंबाची दुर्मीळ छायाचित्रे यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका मोठ्या आणि वैभवशाली कालखंडाचा समग्र दस्तऐवज, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. महानायक अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना हे देखील पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

यावेळी मीनाताई म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे दीदींच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त मी दिलेली प्रेमाची भेट आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा देण्याचा पुरेपूर प्रयत्न याद्वारे मी केला आहे. यासाठी उषा मंगेशकर यांनी देखील मला खूप मदत केली. बुधवारपासून हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. ‘मोठी तिची सावली’प्रमाणेच ‘दीदी और मैं’ हा हिंदी अनुवाददेखील परचुरे प्रकाशन मंदिरने प्रकाशित केला आहे.