
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना काँग्रेसने पहिल्या यादीत स्थान न देता प्रतिक्षेत ठेवले आहे. जिल्ह्यामध्ये माजी खासदार राजीव सातव व गोरेगावकर या दोघांचे काँग्रेस पक्षांतर्गत गट आहेत. सातव यांच्याकडून गोरेगावकरांविरोधात काही उमेदवारांची चाचपणी झाली होती. मात्र, भाजपला टक्कर देण्याची क्षमता असल्याने गोरेगावकर हेच उमेदवार राहतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत असून उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा करत माजी आमदार भाऊराव पाटील हे दोन दिवसापासून सत्कार स्वीकारत फिरत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी कळमनुरी व हिंगोली हे काँग्रेसकडे तर वसमत राष्ट्रवादीकडे आघाडीत यापूर्वी सोडण्यात आले होते. गुजरात राज्यातील निवडणुकीची जबाबदारी असल्याचे कारण पुढे करुन काँग्रेसच्या राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, हिंगोलीत गोरेगावकर, हदगावमध्ये माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पक्षांतर्गत विरोधामुळे दगाफटका होऊ नये म्हणून सातव यांनी निवडणूक लढविली नाही. सातव यांना आता काँग्रेसने मराठवाड्याचे निवडणूक प्रभारी पद दिले आहे. पाच वर्ष खासदार असतांना पक्षांतर्गत विरोधकांचा हिशोब चुकता करण्यासाठी सातव गट सक्रिय होता. त्यातुनच हिंगोलीमध्ये विनायक देशमुख, सुरेश सराफ यांच्या विधानसभा लढविण्यासाठी इच्छा जागृत करण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र, हिंगोलीत पंधरा वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सातव यांच्याशी जुळवुन घेतले नाही. भाजपचा वाढता प्रभाव पाहुन सातवांनी तयार केलेले उमेदवार लढण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच नाईलाजाने काँग्रेसला मैदानात उतरवावे लागणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
गोरेगावकर यांनी मागिल आठ दिवसापासुन जनसंपर्क वाढविला आहे. दिल्लीतुन काँग्रेसने जाहीर केलेल्या 51 जणांच्या यादीत गोरेगावकर यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे काही समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. तर दोन दिवसापासुन हिंगोली शहरात विविध ठिकाणी भेटी-गाठी देऊन उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा करत गोरेगावकरांकडुन सत्कार स्वीकारले जात असून सोशल मीडियावर या पोस्ट फिरत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या कळमनुरी या दुसऱ्या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी खासदार सातव यांनी कळमनुरीच्या होम पीचवर लढावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सातव यांनी न लढणे पसंत केले आहे.




























































