
एकाची हत्या आणि एकाला जखमी करून पळून जाणाऱ्या एका आरोपीला सतत 10 दिवस पाठलाग करून पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. वसिम बरकत अली असे आरोपीचे नाव आहे.
उरण द्रोणागिरीमधील आयओटीएल कंपनीजवळ परवेझ समशद अली खान (27) याच्यावर 17 सप्टेंबर रोजी सज्जाद, वसिम अली आणि एका अनोळखी अशा तीन आरोपींनी आरोपींनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला होता. या हल्ल्यात परवेझ खान हा जागीच ठार झाला. यावेळी हे भांडण सोडविण्यास गेलेल्या परवेझ खान याच्या भावालाही आरोपींनी जखमी करून तेथून पोबारा केला. उरण पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींच्या मागावर होते. खून केल्यानंतर आरोपी मोबाईल बंद करून वेगवेगळ्या दिशेला पळून गेल्यामुळे त्यांचा माग लावणे पोलिसांना कठिण झाले होते. हे आरोपी लोखंडाच्या कॉईल असलेल्या गाडीत नागपूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सतत 10 दिवस पाठलाग केल्यानंतर एका जंगलात वसिम बरकत अली याला अटक केली. शनिवारी त्याला उरण येथे आणण्यात आले. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतुल आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.जी. कावले, पोलीस हवालदार संजय कुथे, रोहीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



























































