बियांत सिंग यांच्या मारेकऱ्याला फाशीऐवजी जन्मठेप, केंद्राच्या निर्णयामुळे पंजाबमध्ये राजकीय भूकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग यांच्या हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा भोगत असलेल्या मारेकऱयाला केंद्र सरकारने फाशीऐवजी जन्मठेप दिली आहे. गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारने पंजाबमध्ये दहशतवादाच्या काळात दोषी ठरलेल्या आणि देशभरातील तुरुंगांत शिक्षा भोगत असलेल्या आठ शीख कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला तसेच बियांत सिंग यांच्या मारेकऱयाची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली. या निर्णयावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे तर शिरोमणी अकाली दलाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पंजाबमधील दहशतवाद मोडून काढण्यात महत्त्वाचे योगदान असलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग यांच्या हत्येत दोषी आढळल्यामुळे बलवंतसिंह राजोआना याला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता केंद्राने त्याच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केल्यामुळे पंजाबचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्राच्या या निर्णयात राज्य सरकारचा काहीही हात नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून टाडा कायद्यानुसार ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे, अशांचीच यादी देण्यात आल्याचे म्हटले आहे.