आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आठ वर्षांच्या चिमुकलीने जीव गमावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औराद शहाजानी येथील आठ वर्षाच्या मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावामध्ये नाल्यांची साफसफाई करणे व रस्ते दुरुस्ती करणे, नवीन रस्ते तयार करणे, ठिकठिकाणी साचलेले पाणी जिरवण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना न करणे यामुळे गावांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे.

मागील दोन महिन्यापासून गावातील विविध भागातील लहान लहान मुलांना डेंग्यूसारख्या आजाराने ग्रासलेले असल्यानेच प्रगती शिंदे हिला डेंग्यूची लागण झाली. ताप आल्याचे कळताच तिच्या वडिलांनी येथीलच खासगी रुग्णालयात रक्त तपासणी केली. मुलीला डेंग्यू झाला आहे हे कळताच त्यांनी लगेचच लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी आजार बळावून प्रगती हिची प्राणज्योत मालवली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिचा निष्पाप बळी गेला आहे, अशी प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत आहे.