कराड उत्तरमधून धर्यशील कदम यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील धर्यशील कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील कदम यांना शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा खांद्यावर दिला. यापूर्वीच माण – खटावमधून शेखर गोरे, कोरेगावमधून महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर पाटणमधून शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई हे पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास करीत आहेत.

सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असून सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भगवा फडकवला जाईल असा विश्वास शिवसेनेचे सातारा – सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे आणि या परिवर्तनासाठी शिवसेनेकडे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शिवसेना हाच एकमेव भक्कम पर्याय असल्यामुळे शिवसेनेमध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक नेते प्रवेश करीत आहेत असेही नितीन बानुगडे पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कराड उत्तरमधून धर्यशील कदम यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सातारा – सांगली संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, विक्रमशिल कदम, आनंद सावंत, जयकांत जगदाळे, विनायक भोसले, हिंदुराव चव्हाण, दिपक लिमकर, सुदाम दिक्षित, अविनाश सांळुखे, विकास जाधव उपस्थित होते.