
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर, लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मंगळवारी सकाळी जम्मूतील एका बसमधून 15 किलो स्फोटके जप्त केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कथुवा जिल्हय़ातल्या बिलावर भागातून ही बस सकाळी 5 वाजता सुटली. या वेळी एका महिलेने स्फोटकांची बॅग बसचालक आणि कंडक्टरकडे सोपवली. जम्मू ही बॅग घेण्यासाठी एक व्यक्ती येईल, असे सांगितले. दरम्यान, याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांनी कारवाई करत स्फोटकासह बसचालक, वाहकासह स्फोटके घ्यायला येणाऱया एकाला ताब्यात घेण्यात आले. या आधी लष्कराने 23 सप्टेंबरला बिलावरमध्ये एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 40 किलो स्फोटके जप्त केली होती.




























































