वाहतूक पोलिसांना डोकेदुखी, ई–चलानची थकबाकी 80 कोटी रुपयांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात वन स्टेट वन ई-चलान मोहीम पोलीस दलाकडून राबविण्यात येत आहे. पण ही ई- चलान मोहीम आता पोलिसांनाच डोकेदुखी ठरू लागली आहे. या मोहिमेतंर्गत पोलीस नियम मोडणाऱया चालकांवर धडक कारवाई करीत आहेत. पण असे असताना राज्यात अनपेड चलान केसेसची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. केलेल्या केसेसची कोटय़वधी रुपये दंड वसुली करणे बाकी असून जर वेळेत ती केली नाही तर चलानच्या दंडाच्या रकमेचा आकडा आणखी मोठा होईल अशी चिंता पोलिसांना लागून राहिली आहे.

वाहतुकीचे निमयम मोडणाऱया चालकांविरोधात पोलिसांकडून राज्यभरात ‘वन स्टेट वन ई-चलान’ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत मुंबईतील चालकांविरोधात 26 लाख 66 हजार 342 इतके ई-चलान पेंडिंग असून त्या चलानची दंडाची रक्कम 80 कोटी 10 लाख 23 हजार 103 रुपये इतकी आहे. गंभीर बाब म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तालयातील हजारो वाहनचालकांवर पाच हजारपेक्षा जास्त दंड आकारण्यात आलेला आहे. एका चालकाने अनेकदा वाहतूक नियम मोडल्याने त्या चालकावर वारंवार ई-चलानद्वारे कारवाई झाल्याने अशा चालकांच्या नावे पाच हजारहून जास्त दंड जमा झाला आहे. त्यामुळे अशा चालकांकडून शक्य तितक्या लवकर दंडाची रक्कम वसूल करावी असे महामार्ग पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळविण्यात आले आहे.

अचानक दंडाचा आकडा समजतो

आपल्यावर झालेल्या ई-चलानची बहुतेक चालकांना माहितीच नसते, परंतु कधी नियम मोडताना चालक रंगेहाथ पकडला गेला की त्याच्यावर किती ई-चलानच्या केसेस आहेत आणि किती दंड झाला आहे ते तेव्हा समजते. असा प्रकार सध्या सर्रास होत आहे.

ई-चलान होते, पण कळतच नाही

पोलिसांकडून नियम मोडणाऱया चालकांना ई-चलान केले जाते. पोलीस संबंधितांच्या वाहनाचे फोटो काढून ंिकंवा सीसीटीव्हीच्या मदतीने फोटो काढून त्या चालकाच्या नावावर ई-चलान पाठवते, पण ई-चलानद्वारे केलेली कारवाई संबंधितांना समजतच नाही. परिणामी वाहनचालक निवांत असतात, पण त्याचवेळी त्यांच्यावर ई-चलानची कारवाई सुरू असते. त्यामुळे अशा चालकांवरीली दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे.

ऍपबद्दल माहितीच नाही

पोलिसांचा एमटीपी ऍप आहे. त्या ऍपवर आपल्या वाहनावर झालेल्या इ-चलानची इत्थंभूत माहिती मिळते. कुठल्या नियमाचे उल्लंघन केले कधी केले, कुठे केले, ंिकती दंड झाला ही माहिती तेथे मिळते. परंतु या ऍपची माहितीच नसल्याने चालकांना त्यांच्यावर झालेल्या ई-चलानबाबत काही समजत नाही. परिणामी त्यांच्यावरील दंडाचा आकडा फुगत राहतो.