
दुधाच्या नावाखाली विष पाजून मुंबईकरांच्या जिवाशी खेळणाऱया टोळीच्या ‘युनिट 10’ने मुसक्या आवळल्या. मसी सादिक खोत, नजीब खोटाल, अनिस खांदे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईत काही ठिकाणी तबेले आहेत. गाई-म्हशींना जास्त दूध यावे याकरिता काही तबेले मालक हे ऑक्सिटोसीनचा वापर करत असल्याची माहिती युनिट 10 चे सचिन ठोंबरे यांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी सत्यता पडताळली. आरोपीच्या अटकेकरिता पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 10 चे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने तपास सुरू केला.
ऑक्सिटोसीनच्या विक्रीसाठी काहीजण गोरेगाव परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरे परिसरात सापळा रचून नजीब आणि अनिसला ताब्यात घेतले. या दोघांकडून ऑक्सिटोसीनच्या एक हजार बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा कल्याण येथील गोदामात ऑक्सिटोसीनचा साठा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कल्याण येथे कारवाई करून 500 लिटर औषधाचा साठा जप्त केला. औषधाची विक्री करणाऱया मसी सादिक खोतला पोलिसांनी गजाआड केले.
पश्चिम बंगाल येथून आणायचे केमिकल
ही टोळी पश्चिम बंगाल येथून केमिकल आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ते स्वतः ऑक्सिटोसीन बनवून त्याची विक्री करायचे. लहान मुलांना असे दूध प्यायल्या दिल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्या औषधावर बंदी आहे. बंदी असतानाही ही टोळी औषधाची विक्री करत होती. एफडीएचे अधिकारी या टोळीचा शोध घेत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते टॅक्सीचा वापर करायचे.























































