
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह रोहित पवार यांचा यामध्ये समावेश आहे. आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या माणिवराव कोकाटे यांनाही उमेदवारी देण्यात आली असून पहिल्या यादीत 20 विद्यमान आमदारांसह नवीन व तरुण चेहर्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर शरद पवार यांचा नातू रोहित पवार याला कर्जत-जामखेड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. येवल्यातून छगन भुजबळ, घनसावंगीतून राजेश टोपे, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील, परळीतून धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे आणि तासगावमधून सुमन आर. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
पहिल्या यादीत मुंबईतील तीन जागा
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत मुंबईतील तीन जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विक्रोळीतून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ आणि दिंडोशीतून विद्या चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे.



























































