
जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत असहकार आंदोलनामुळे कंटेनर मालाची वाहतूक पुरती कोलमडली आहे. यामुळे कंटेनर मालाची वाहतूक थंडावल्याने 12 वाहतूक संघटनांच्या सुमारे अठरा हजार ट्रक-ट्रेलर्स परिसर आणि विविध रस्त्यांवर दुतर्फा उभे करण्यात आले आहेत. आंदोलनामुळे जेएनपीटी बंदर आणि परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.
जेएनपीटी बंदरातून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते.बंदरातून करण्यात येत असलेल्या कंटेनर मालाच्या हाताळणीच्या व्यापारात हजारो आयात-निर्यातीदार, शिपिंग कंपन्या,सीएचए, लाॅजिस्ट्रीक ऑपरेटर, विविध प्रकारचे काम करणारे ठेकेदार आणि ट्रक-ट्रेलर्सव्दारे देशभरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या बाराहुन अधिक वाहतूक संघटना कार्यरत आहेत. या बारा विविध वाहतूक संघटनांच्या सुमारे 18 हजार ट्रक-ट्रेलर्स नियमितपणे कंटेनर मालाची देशभरात वाहतूक करीत आहेत. मात्र बंदरातून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची पाळी येते.वाहतुकदारांना भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांनी अनेक वेळा आंदोलन, संघर्ष केला आहे.परंतु समस्या सुटल्या नाहीत.त्यामुळे संतप्त झालेल्या न्हावा-शेवास्थित कार्यरत असलेल्या सर्व वाहतुकदार आणि वाहतूकदार संघटनांनी बेमुदत गुरुवारपासून (३ )बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे. वाहतूकदारांनी आपल्या अस्तित्वासाठी सुरू केलेल्या निकराच्या लढाईत 12 वाहतूक संघटना आंदोलनात उतरलेल्या आहेत. त्यामुळे बंदरातून होणारी वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. वाहतुकदारांनी सुरू केलेल्या संपानंतर जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही संपर्क साधलेला नाही.त्यामुळे वाहतुकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन बेमुदत सुरुच ठेवण्यात येणार असल्याचेही पैठणकर यांनी सांगितले.वाहतुकदारांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनामुळे मात्र जेएनपीटी बंदर आणि परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.























































