हिंदुस्थान हॉकी संघाचे निर्भेळ यश,अखेरच्या कसोटीतही बेल्जियमचा 5-1 ने धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेल्जियमच्या दौऱयावर असलेल्या हिंदुस्थानच्या हॉकी संघाने कसोटी मालिकेत 5-0 अशा फरकाने निर्भेळ यश संपादन केले. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही पाचव्या मानांकित हिंदुस्थानने द्वितीय मानांकित यजमान बेल्जियमचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवून मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला.

लागोपाठच्या विजयामुळे अखेरच्या लढतीतही हिंदुस्थानी खेळाडू आत्मविश्वासाने खेळले. समरजित सिंगने सातव्याच मिनिटाला गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले. दुसऱया क्वॉर्टरमध्ये 16व्या मिनिटाला बेल्जियमला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. मात्र, हिंदुस्थानच्या कृष्णन बी. पाठकने दोन्ही पेनल्टीवर यजमानांना गोल करू दिले नाही. त्यानंतर ललित कुमार उपाध्यायने 35व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढविली. पुढच्याच मिनिटाला विवेक सागर प्रसादने बेल्जियमच्या गोलरक्षकाला चकवून भन्नाट गोल केला अन् हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. 38व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी मिळाली, पण गोलरक्षक पीआर श्राजेशने ही पेनल्टी अडवल्याने बेल्जियमची निराशा झाली.