नोकराकडून मालकीणीचा खून; पळून जाताना नोकराचाही मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

उत्तर गोव्यातील हडफडे येथे वृद्ध नोकराने आपल्या वृद्ध मालकिणीचा डोक्यात लोखंडी पाईप मारून खून केला. खून करून पळून जाताना पडल्याने गंभीर जखमी झाल्याने नंतर त्याचाही मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिरील मोदी ही 66 वर्षीय वृद्ध महिला मूळ मुंबई येथील आहे. गेल्या 20 ते 22 वर्षा पासून ती कुटुंबीयांसोबत वेगसवाडा- हडफडे येथे राहत होती. त्यांच्याकडे प्रफुल जन (65) हा मूळचा ओरिसा येथून आलेला वृद्ध बागकाम करणारा नोकर म्हणून गेल्या 3 वर्षा पासून काम करीत होता. तो मोदी यांच्या घरापासून जवळच भाड्याच्या घरात राहत होता. रविवारी  सकाळी 10.30 च्या सुमारास शिरील मोदी व प्रफुल जन यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. भांडणांनंतर संतापाच्या भरात प्रफुलने रागाच्याभरात  घराबाहेर पडलेला लोखंडी पाईप उचलून शिरील मोदी यांच्या डोक्यात मारला आणि तो तेथून पळून गेला.

प्रफुल्लने केलेल्या हल्ल्यात शिरील मोदी या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान प्रफुल्ल जन हा शिरीलवर खूनी हल्ला करून पळून जात असताना रस्त्यावरच पडून जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रफुल्लला मृत घोषीत केले.