गांधी कुटुंबीयांसोबत आता परदेशातही कमांडो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात जाणाऱ्या व्हीव्हीआयपी व्यक्तींसोबत स्पेशल प्रॉटेक्शन फोर्सचे (एसपीजी) कमांडो पाठवण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला. मात्र कमांडोंच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवण्याचा भाजप सरकारचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

एसपीजी सुरक्षा व्यवस्था वापरणाऱ्या व्हीव्हीआयपी नागरिक परदेशात जातील तेव्हाही त्यांच्यासोबत हे कमांडो पाठवण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या सुविधेच्या नियमांचे पूर्ण पालन केले पाहिजे. या नियमांमध्ये आता कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या ही सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा या चौघांना आहे.

गांधी कुटुंबीयांवर भाजपकडून या कमांडोंद्वारे पाळत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलप्पा यांनी केला आहे. मात्र काँग्रेस नेत्यांना मिळणाऱया या सुविधेबाबत केंद्र सरकारने काहीच म्हटलेले नाही की या नियमांमध्ये त्यांनी बदलही केलेले नाहीत. केवळ हे नियम काटेकोर पाळावे लागतील असे केंद्राने म्हटल्याचे भाजपने म्हटले आहे.

गांधी कुटुंबीय नियम पाळणार
गांधी कुटुंबीयांपैकी कुणीही देशाबाहेर जात असेल तर त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था विमानतळावरून परत जाते. पण ही एक प्रकारची बेपर्वाई असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्राने याबाबतचे नियम कडक करण्याचे ठरवले आहे. गांधी कुटुंबीय हे नियम यापुढे काटेकोर पाळणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. मात्र त्यांच्यासोबत एसपीजी सुरक्षा नाही, पण यापुढे असे होणार नाही असेही काँग्रेसने स्पष्ट केले.