
आज विजया दशमी. महिषासुरावर देवी दुर्गेचा, रावणावर रामाचा, कौरवांवर पांडवांचा अर्थात अशुभावर शुभाचा विजय साजरा करण्याचा दिवस. आज हिंदुस्थानात ठिकठिकाणी राम लीला साजरी केली जाईल आणि त्यानंतर रावणाच्या महाकाय पुतळ्याचं दहन केलं जाईल.
रामायणात दुष्ट, अहंकारी आणि वासनेने भरलेला रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. शिवशंकराकडून वरदान मिळवणारा निस्सीम शिवभक्त होता, प्रकांड पंडित होता. कुबेराचा भाऊ असूनही त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर सोन्याची लंका निर्माण केली होती. त्यामुळेच कदाचित देशातल्या काही ठिकाणी त्याची पूजा केली जाते. देशभरात अशी आठ ठिकाणं आहेत जिथे रावण दहन नव्हे तर रावण पूजन केलं जातं.
मंदसौर, मध्यप्रदेश-
असं म्हणतात की मंदसौर या जागेचं मूळ नाव दशपूर होतं. हे गाव म्हणजे रावणाची पत्नी मंदोदरी हिचं माहेर आणि अर्थात रावणाची सासुरवाडी. साहजिकच रावण इथला जावई आहे आणि जावयाच्या पुतळ्याचं दहन करणं शक्य नाही. म्हणून त्याला पूजलं जातं.
कर्नाटक-
खरंतर कर्नाटक म्हटलं की आठवतो तो म्हैसुरचा दसरा. पण कर्नाटकातील कोलार नावाच्या जिल्ह्यात मात्र रावणाची पूजा केली जाते. रावणाच्या शिवभक्त रुपाची इथे पूजा केली जाते. इथे मंडया तालुक्तातील मालवली या गावात रावणाचं मंदिर आहे. तिथे त्याची पूजा केली जाते.
जोधपूर, राजस्थान-
राजस्थानातल्या जोधपूरमध्ये रावणाचं मंदिर आहे. इथे विशिष्ट समाजाचे लोक स्वतःला रावणाचे वंशज मानतात. त्यामुळे दसऱ्याला ते रावणाचं दहन न करता पूजा करतात.
काकिनाड, आंध्रप्रदेश-
आंध्रप्रदेशच्या काकिनाड मध्ये रावणाचं मंदिर आहे. इथे रावणाला सामर्थ्यशाली मानलं जातं. इथल्या शिवमंदिरात शंकरासोबत रावणाचंही पूजन होतं.
बैजनाथ, हिमाचल प्रदेश-
इथल्या कांगडा जिल्ह्यातही रावणाची पूजा होते. रावणाने इथेच शिवशंकरांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून वर मागितला. तसंच इथल्या लोकांचा असा समज आहे की, जर त्यांनी रावण दहन केलं तर त्यांचा मृत्यू ओढवेल. त्यामुळे भीतीपोटीही त्याचं दहन केलं जात नाही.
बिसरख, उत्तर प्रदेश-
बिसरख या गावाला रावणाचं आजोळ मानलं जातं. त्यामुळे अर्थात रावण या गावचा नातू ठरतो. त्यामुळे इथेही त्याचं एक मंदिर आहे आणि दसऱ्याला त्याची पूजा केली जाते.
महाराष्ट्र-
महाराष्ट्रातील कोरकू नावाच्या आदिवासी जमातीतले लोक रावण आणि त्याचा मुलगा मेघनाद यांना आपले रक्षक मानतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणाचं पूजन करून उत्सव साजरा केला जातो.
उज्जैन, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातल्या उज्जैन जिल्ह्यात चिखली या गावात रावण दहन केलं जात नाही. जर असं केलं तर संपूर्ण गाव जळून खाक होईल, असा इथला समज आहे. इथे रावणाची भव्य मूर्तीही असून दसऱ्याला त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.






















































