
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला ढासाळतो याची प्रचिती 1995 ला आलेली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचा दारुण पराभव या मतदारसंघात झाला होता. या निवडणुकीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तिरंगी लढतीमध्ये एकसंघ असणारी शिवसेना भाजपा युती आणि दुबळी झालेली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रसचे परंपरागत मतदान खेचणारी वंचित बहुजन विकास आघाडी असा सामना रंगणार आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असते. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या मतदारसंघात आता पूर्वीची स्थिती राहिली नाही. नवमतदार हा काँग्रेसपासून दूरच आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे सगळी सत्तास्थाने होती. या निवडणुकीतील परिस्थिती वेगळी आहे. लातूर शहरातील महानगरपालिकेवर भाजपाची बहुमताची सत्ता आहे. जिल्हा परिषदेवरही भाजपाची बहुमताची सत्ता आहे. काँग्रेसला नाकारणारा मतदार या मतदारसंघात तयार झाला आहे. शिवसेना भाजपा युतीच्यावतीने पुन्हा एकदा शैलेश लोहोटी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार अमित देशमुख यांनाच उमेदवारी दिली असून वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक राजा मणियार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसला परंपरागत मतदार दुरावण्याचा मोठा धोका आहे. मुस्लीम समाजामध्ये काँग्रेसबद्दल मोठी नाराजी असून राजा मणियार यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पराभवाच्या चक्रव्युहात सापडणार असे म्हटले जात आहे. राजा मणियार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना मिळणारा प्रतिसाद काँग्रेसच्या अडचणी वाढवत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता परंपरागत दलीत मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हा मतदार काँग्रेसला कितपत तारणार हा प्रश्नच आहे. कारण वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लातूरात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तो मतपेटीत पोहचला तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर जाईल असे म्हटले जात आहे.
लातूर शहर मतदारसंघातून आमदार अमित देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे बंधू धीरज देशमुख रिंगणात आहेत. काँग्रेसने इतरांना डावलल्याची भावना तीव्र असून ही घराणेशाही मोडीत काढण्याची हीच संधी असल्याचे म्हटले जात आहे. एकाच घरात दोन्ही उमेदवारी दिल्याचा फटका काँग्रेसला दोन्ही मतदारसंघात बसेल असेही म्हटले जात आहे.























































