बेरोजगार इंजिनीयरना पालिकेची 25 लाखांची कामे मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

पालिकेच्या माध्यमातून मुंबईत केली जाणारी पाच लाखांपर्यंतची कामे बेरोजगार इंजिनीयरना मिळणार आहेत. ही कामे समाधानकारकरीत्या केल्यास एका वर्षांत 25 लाखांपर्यंतची कामे दिली जाणार असून या प्रत्येक कामाची किंमत पाच लाख असेल. याबाबतचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

इंजिनीयरिंग क्षेत्रात सध्या मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेनेही नगरसेकक निधी व विकास निधीच्या तरतुदींपैकी 25 टक्के रकमेपर्यंतची कामे बेरोजगार इंजिनीअरकडून करून घ्यावीत, अशी ठरावाची सूचना शिवसेना  नगरसेवक मंगेश सातमकर यांनी पालिका सभागृहात केली होती. नगरसेवक निधीतून 60 लाख व विकास निधीतून एक कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. यातील कामे बेरोजगार इंजिनियरना दिल्यास त्यांना हक्काचा रोजगार मिळेल, असे सातमकर यांनी आपल्या सूचनेत म्हटले होते. त्यावर प्रशासनाने लेखी अभिप्राय देताना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या तीन लाखांपर्यंतची छोटी कामे बेरोजगार इंजिनीअरना निकिदा न भरता लॉटरी पद्धतीने दिली जातात. तशाच पद्धतीने पाच लाखांपर्यंतची कामे बेरोजगार इंजिनीअरना देता येतील, अशी तरतूद  सुधारित मुंबई महापालिका कायदा 1888 चा कायदा कलम 72 अ मध्ये अंतर्भूत केली आहे.

…तर 60 लाखांपर्यंतची कामे मिळतील

पालिकेतील सर्व कामे ई-निविदा पद्धतीने दिली जातात. मात्र बेरोजगार इंजिनीयर ही कामे मिळवण्यापासून वंचित राहातात. त्यामुळे राज्य सरकारने पालिका कायदा 1888च्या कलम 72 अ अंतर्गत सुधारणा केल्यास 60 लाखांपर्यंतची कामे देता येऊ शकतात. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर 25 टक्क्यांपर्यंतची कामे देण्याचा निर्णय घेता येईल, असे पालिकने स्पष्ट केले आहे.

पालिका म्हणते…

 25 लाखांपर्यंतची कामे दहा वर्षाच्या कालावधीतील पदवी व इतर अटी शर्ती पूर्ण करण्याची क्षमता आहे, त्यांना कलम 72 अ नुसार सुरुवातीला पाच लाखांची कामे देण्यात येतील. ही कामे समाधानकारक केल्यास एका वर्षांत 25 लाखांपर्यंतची कामे दिली जातील. मात्र प्रत्येक कामाची किंमत पाच लाखांपेक्षा जास्त नसेल, अशी तरतूद कायद्यात असल्याचे पालिकेने म्हटले आहे.