त्याचं वेगळेपण जाणवत राहतं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

गौतम कोळी. विविध दिग्दर्शकांची नावं रोजच्या मालिकांमुळे समोर येत राहतात. काही विसरली जातात… काही मात्र ठसठशीतपणे आपलं काम मांडत राहतात.

मोठय़ा बंधूच्या प्रयत्नाने नोकरी लागली पण गौतमचं मन रमेना… ती सोडली… भावानं पुन्हा प्रयत्न करून दुसरी नोकरी शोधली, गौतम रुजू झाला. पण तो फार काळ थांबला नाही. इथं भाऊही हरेना… आणि गौतम काही नोकरी सोडायचं थांबेना… पण भावाचा अतोनात जीव गौतमवर. त्यानं पुन्हा प्रयत्नपूर्वक एक नोकरी शोधली. एस. कुमारमध्ये. त्यावेळेसची एक वस्त्रोद्योगामधली नामांकित कंपनी. पण गौतमला काही जमेना.

‘अहो गौतम कोळी. तुम्हाला नोकरीवर घेतलं, पण तुमचं काही कामात लक्ष दिसत नाही.. कारण ज्यांना नोकरी नाही असे बरेचजण आहेत. त्यांना को नोकरीपासून दूर ठेवताय? एक जागा का अडवून ठेवताय? त्या त्याच्या अधिकाऱयाचं म्हणणं गौतमला पटत होतं. पण काय…? याचा शोध ‘गौतम’चा चालू होता. तुम्ही येऊ नका. कारण तुमचं लक्ष नसतं कामात… तुम्ही दांडय़ा मारता.. हे खरं होतं.  एक दिवस त्याला मस्जिद बंदरला गेलेलं बालपण, तिथं त्यानी त्याला सवंगडय़ांसोबत केलेलं सिनेमा चित्रीकरणाचं नाटक आठवू लागलं…

‘आपण फायरिंग सीन शूट कर’ गौतम. सवंगडी तो फायरिंग सीन करायचे आणि गौतम अदृश्य कॅमेऱयाने ते सीत चित्रीत करायचा. मनातल्या मनात…

ते उलगडून असं बाहेर पडत नव्हतं. त्याला सीन दिसायचे, वेगवेगळय़ा अँगलनं शॉटस् दिसायचे, पण ते कसं करायचं, तिकडं जायचं कसं…? सगळाच शोध चालू होता. जोडीला हाऊस ऑफ सोव्हीएत कल्चर आणि मॅक्समूलर भवनमध्ये पाहिलेले सिनेमे मनात आंदोलन करत होते. धक्के देत होते. हे मनातलं, हे पाहिलेलं, कुठतरी सांगायला पाहिजे याची उर्मी दाटत होती. पण वाट…? ती काही दिसत नव्हती. पण मग… ती वाट कुठंय याचा शोध सुरू झाला. ती वाट आपल्या दिशेनं येण्यापेक्षा आपणच त्या वाटेकडं जाऊ. या शोधात काही निर्विवाद बुद्धिमान, मनसबी मंडळी भेटली.

गौतमला आपल्या हव्या असलेल्या जगतात आल्याचा दिलासा मिळाला. तो तिथं स्थिरावू लागला.. खडतर होतं, पण हेच तर हवं होतं…
‘तू शॉट डिझाईन कर…’
विजय देशमुख ज्यांना गौतम मनोमन खूप मानतो. ते गौतमला म्हणाले,‘तुला स्टोरी, स्क्रीन प्ले सगळं माहीत आहे, सगळय़ा प्री-प्रॉडक्शनला तू होतास ना? मग चल सांग कॅमेरा कुठं प्लेस करायचाय.?’

हा सगळा संवाद गौतमला जशाला तसा आठवतोय… कारण त्या संबंधित मालिकेचा दिग्दर्शक सेटवर आलाच नव्हता आणि मोबाईल, फोनही अशी फारशी सुविधा नसल्यानं ते कधी येणार हेही माहीत नव्हतं… त्यांची वाट पाहून झाल्यावर उद्वेगानं देशमुख म्हणाले, ‘चल सुरू करू. तू सांग काय शॉट ते’ गौतमनं शॉट सांगितला आणि ‘ऍक्शन’ सुरू झाली. मालिका गाजली. अंतर्गत वर्तुळात गौतमला त्याच्या कामाची शाबासकी मिळाली आणि पहिला व्यावसायिक धडा तो शिकला ‘वेळ’. वेळ पाळणं किती महत्त्वाचं… गौतम आजही सगळय़ांच्या अगोदर सेटवर हजर असतो. त्या दिवशी त्या दिग्दर्शकाचं वेळ चुकवली… गौतमनं ती हेरली… पण ताब्यात येईल ती परिस्थिती कसली… गौतमचा पुढे, आणखी खूप करण्याचा झगडा चालू होताच… त्याला थांबायचं नव्हतं. कारण त्याचं मनोमनं स्वच्छ ठरलं होतं. त्याला दिग्दर्शकच व्हायचंय. क्रिस्टल क्लियर…

तो सिनेमा माध्यमाविषयक सगळय़ा संबंधित उपमाध्यमांमध्ये वावरू लागला. समजावून घेऊ लागला. त्याला हवी असलेली वाट तो स्वतःच कोरू लागला. थोडी वाट सापडल्याचं वाटू लागलं आणि विद्याधर पाठारे नावाचा त्याचा मित्र त्याला भेटला त्यानं गौतमला दुरुस्त केला. त्यांनी काय केलंय यापेक्षा आता तू काय करणार आहेस ते बघं. तेव्हा गौतम संकलक म्हणून विद्याधर यांच्याकडे सहकारी म्हणून काम करत होता. त्यांनी ठीक आहे. कचरा दिलाय, चल तू याचं सोनं कर…’

पाठारेंचा हा सल्ला गौतम आजही पाळतो आणि या सल्ल्याबद्दल तो पाठारेंचा खूप ऋणी आहे. कारण त्या सल्ल्यानं त्याला जमिनीकडं खेचलं आणि तेव्हापासून जो गौतम ‘रुटेड’  झालाय. तो आताही सेम तसाच आहे.  एका पाठोपाठ एक उत्तमोत्तम मालिका तो दिग्दर्शित करू लागला आणि तंत्राची आवड असणारा गौतम ‘कंटेट’वर स्थिरावू लागला याचं त्यालाच कौतुक वाटतं…

मग धडाका सुरू झाला भान आलेल्या दिग्दर्शकाचा… ‘लक्ष्मणरेषा’ या झी टीव्हीच्या मालिकेच्या निमित्तानं मी गौतमला जाणलं. त्या आधी ‘वादळवाट’ला आम्ही भेटलो होतो. पण तो धागा नट-दिग्दर्शकातला विणला गेला नव्हता.. लक्ष्मणरेषेला आम्ही मित्र झालो. तो खवय्या आहे. आम्ही तेव्हा दादरला शूटिंग करायचो. लंचमध्ये आम्ही दोघे (मी आहे त्या कपडय़ानिशी) रोज वेगवेगळय़ा हॉटेलमध्ये (मांसाहारी) जेवायला जायचो. ती चव… आणि त्याचं खवय्यापण… केवळ अद्वितीय.. ‘मेघ दाटले’नं गौतमला व्यावसायिकारित्या उंचीवर नेलं. गौतम स्थिरावला त्याचे सासरे… गुरू मा. आदरणीय कमलाकरजी सोनटक्के यांनी त्याला जो गुरूमंत्र दिला त्याबद्दल गौतम खूप आदरानं बोलतो…

‘पन्नास गाढवं ठेवण्यापेक्षा दोनच घोडे ठेवावेत.’ तथा ‘पन्नास कर्मचारी ठेवण्यापेक्षा दोनच सक्षम अधिकारी ठेवावेत.’ हा धडा गौतमला भाव देऊन गेला.. तो त्याचं आकलन, तथा पालन करण्याचा प्रयत्न करतोय. अमलात आणतोय…

 तीच गोष्ट मानसी सोनटक्के कोळींची स्वतः मानसी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आहेत. तिथं रंग-रेखा याचं भान असणं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गौतम मानसीचं त्याच्यासोबत असणं अनन्यसाधारण मानतो. तो तिला बरोबरीचं स्थान देतो. वाटाच देतो जणू. आपसातल्या प्रेमाचं उजवेपण याहून काय वेगळं असतं…? ‘मला विनोद (कॉमेडी) खूप आवडते’ माझ्यासकट अनेकांना गौतमच्या स्वभावाचा संशय यायला लागला, पण तो म्हणतो मला कॉमेडी खूप आवडते… इतका शांत, संयमी तो असं म्हणाल्यावर अरे असं कसं? असं होतं. तो (कमी बोलणार!.. मोजकंच) तेवढाच तो मजेदार… मोकळा आहे. त्याला E.P. व्हायचंय. त्याच्या सगळय़ा Director Brotherhood साठी त्याला त्या सगळय़ा दिग्दर्शक मित्रांचा तो फ्री हॅण्ड द्यायचाच.. संयमी, अबोल, सृजन गौतम तू वेगळाच आहेस. खूपच बोलणाऱया या जगात तुझं हे कमी बोलणं खूप बोलून जातं… संयमाचा बांध आहेस तू.

डीयर गौतम. तुला E.P. व्हायचंय पण तिथं किती संयम लागतो हे तुला ज्ञात आहेच. तू तुझ्या संयमाचा बांध तुटू देणार नाहीसच दोस्ता… तो तसाच अतूट राहो…

[email protected]