जय हो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

सुंदर, बुद्धिमान, धैर्यवान असा जय पक्षी. जय पक्ष्यांमध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता व धैर्य या तिन्हींचा संगम आहे. संशोधनाने असे दर्शविले आहे की, या प्रजातींमध्ये सर्वात मोठे ‘High Vocal Center’ असल्यामुळे आवाजाची पुनर्निर्मिती ते सहजतेने करू शकतात. हे पक्षी कुतूहल, जिज्ञासा, संपर्क, संवाद यांचेही प्रतीक मानतात.

हिमालयामधील चोपटा व सत्ताल येथे ‘युरेशियन जय व काळ्या डोक्याचा जय’ या पक्ष्यांची मला फोटोग्राफी करता आली. जय हे पक्षी कुरविडे कुटुंबातले असून त्यांच्या 35 ते 40 प्रजाती आहेत. मध्यम आकाराचे हे पक्षी गोंगाट करणारे व कळपाने राहणारे आहेत. म्हणूनच की काय, अमेरिकेतील बोलीभाषेमध्ये अनावश्यकपणे बोलणाऱया माणसाला ‘जय’ म्हणून संबोधले जाते. या पक्ष्यांची लांबी 34 – 35 सें. मी. असून पंखांचा पिसारा 52 – 58 सें. मी. व वजन 140 ते 190 ग्रॅम्स असते. प्रजातीनुसार यांच्या पंखांमध्ये काळ्या, निळ्या, तपकिरी, क्रीम, राखाडी, गुलाबी, जांभळ्या व पांढऱया रंगांची उधळण असते. यांचे पाय तपकिरी किंवा गुलाबी रंगाचे असून चोच मजबूत, मध्यम लांबीची असते.

हे पक्षी जंगले, शेतजमिनी, शहरात आढळतात. दाणे, बिया, कीटक, अपृष्ठवंशीय किडे, इतर पक्ष्यांची आणि लहान सस्तन प्राण्यांची पिले हे यांचे खाद्य असते. ऋतुमानाप्रमाणे यांच्या आहारामध्ये थोडा बदल होतो. या पक्ष्यांना ओक वृक्षांची फळे फार आवडत असल्यामुळे नैसर्गिकरीत्या बीजारोपण होऊन वृक्षांची संख्या वाढते.

युरेशियन जय

युरेशियन जय हे पक्षी पश्चिम युरोप, उत्तर-पश्चिम आफ्रिकेपासून भारतीय उपमहाद्वीपपर्यंत, आशियाच्या पूर्वेकडील समुद्रकिनारे, दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळतात.  प्रदेशानुसार यांचे रूप थोडे वेगवगळे असते. त्यांचा वरचा भाग गुलाबी-राखाडी ते लालसर तपकिरी असतो. शेपटी काळ्या रंगाची असून वरचा भाग व पार्श्वभाग शुभ्र पांढरा असतो. वरच्या बाजूचे पंख फिकट लालसर – तपकिरी असतात. बाजूच्या पांढऱया पंखांवर निळ्या रेषा असतात. उडताना हे पक्षी त्यांच्या पंखांमुळे फारच सुंदर दिसतात.

जय पक्ष्यांचा आवाज कर्कश असतो व ते वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करू शकतात. दुसऱया पक्ष्याबरोबर मारामारी करत असताना त्या पक्ष्याचा आवाज काढतात. हे पक्षी आपले खाद्य झाडांवर तसेच जमिनीवर शोधतात. प्रजनन काळ प्रदेशानुसार वेगवेगळा असतो. हे पक्षी आपल्या जोडीदाराबरोबर दीर्घकाल राहतात. नर व मादी मऊ पालापाचोळा वापरून झाडावर साधारणतः 4 ते 6 मीटर्सच्या उंचीवर कपाच्या आकाराचे घरटे बांधतात. घरटय़ाला आतून मऊ वनस्पतींचे आवरण देतात. मादी एकावेळी 3-10 अंडी घालते व ती 16 – 19 दिवस उबवते. 19-23 दिवसांनंतर पिले अंडय़ातून बाहेर पडतात. नर व मादी मिळून पिलांचे संगोपन करतात. 7 – 8 आठवडय़ांनंतर पिले स्वतंत्र होतात.

हे पक्षी आपल्या प्रकृतीस्वास्थ्याबद्दल जागरूक असतात. आपले पंख निर्जंतुक करण्यासाठी ते आपले पंख, मुंग्यांनी बनवलेल्या मातीच्या ढिगावर पसरून त्यावर ‘Formic Acid’चा फवारा करतात.

काळ्या डोक्याचा जय

काळ्या डोक्याचा जय हा जवळ जवळ युरेशिअन जयसारखाच असतो, परंतु हा जास्त सडपातळ असून त्याची चोच थोडी लहान व जाडी असते. डोक्याचा वरचा भाग काळा असून डोक्यावर तुरा असतो. शेपटी युरेशियन जयच्या शेपटीपेक्षा लांब असते.

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडे हिमालयापर्यंत, हिंदुस्थानातून नेपाळ आणि भुतानपर्यंत हे पक्षी आढळतात. या पक्ष्यांचा वावर दाट जंगलापेक्षा खुल्या जमिनीवर जास्त असतो. ते जमिनीवर आणि झाडांवर आपले खाद्य शोधतात.

हे पक्षी युरेशियन जयप्रमाणेच आपली घरटी बांधतात. मादी एकावेळी 3-5 अंडी घालते व ती 16 दिवस उबवते. नर व मादी मिळून पिलांची काळजी घेतात. यांचा आवाज पण युरेशियन जयसारखा असतो, परंतु दोन स्वरांमध्ये जास्त विराम असतो.

[email protected]