
लातूर जिल्ह्यातील माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कव्हेकर यांच्या प्रवेशामुळे येथील लातूर शहर व ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. 2009 मध्ये कव्हेकर भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भाजप सोडल्याचा पश्चाताप होत असल्याचे देखील सांगितले.
भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना कव्हेकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी विविध योजना घोषित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विशेषता 370 कलम रद्द करून कश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग असल्याचे दाखवून दिले. तीन तलाक संदर्भातील महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. महाराष्ट्रामध्ये युतीच्या सरकारने अत्यंत चांगले काम केले असून मराठवाड्यातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी मराठवाडा वॉटर योजना जाहीर केली. उजनीचे पाणी लातूरला मिळावे यासाठी सरकारने 600 कोटी रुपये निधी दिलेला आहे. लातूर रेल्वे बोगी कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा आपण भाजपाच्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर येणार आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही पंचांगाची गरज नाही असे देखील त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर, कौशल्या पाटील, शोभा पाटील, नगरसेविका भाग्यश्री शेळके प्रताप शिंदे, बाबासाहेब कोरे, सूर्यकांत शेळके, जमिल मिस्त्री यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
































































