शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष घराणेशाही जपतोय – अमित शहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता घराणेशाहीवादी झाल्याचा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चिखली येथील सभेत लगावला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खासदारांनी संसदेत कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात मतदान केले होते. देशहिताला विरोध करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चिखली येथे जाफ्राबाद रोडवरील खबुतरे ले-आऊटच्या मैदानावर शुक्रवारी विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळई शहा बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, मतांच्या राजकारणापेक्षा आमच्यासाठी देशाचे ऐक्य व सुरक्षा सर्वोच्च असल्याने आम्ही कश्मीर मधून कलम 370 हटवले. त्यानंतरची ही देशातील पहिलीच निवडणूक असल्याने भाजपच्या प्रचारात हा मुद्दा येणे साहजिक असल्याचे ते केले. त्यांनी भाषणात अनेक स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांना स्पर्श केला. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुलढाणा जिल्ह्यासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख शहा यांनी केला. घाटाखालील जिगाव सिंचन प्रकल्प, शेगाव विकास कृती आराखडा, मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी 370 कोटींचा निधी, शेतकर्‍यांसाठी हजारो कृषिपंप जोडणी, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला केलेली 100 कोटींची मदत, अडीच लाख शेतकर्‍यांना दिलेली 6 हजार कोटींची पीककर्ज माफी, 2 लाख 19 हजार शौचालये, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 11 हजार घरकुले अशी सर्व आघाड्यांवर भाजपा सरकारने लोकहिताची कामे केल्याचे शहा म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीने 15 वर्षे महाराष्ट्रात सत्ता असताना प्रचंड भ्रष्टाचार करुन लुटण्याचे काम केले. याउलट आमच्याकडे भागवत सप्ताहाप्रमाणे 7 दिवस सांगूनही संपणार नाही इतपत विकासकामे झाल्याचे ते म्हणाले. जगभरात नरेंद्र मोदी नावाचा गजर होत आहे, कलम 370 संदर्भात काँग्रेसचे गुलाम नबी आजाद म्हणाले होते, कश्मिरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, मात्र रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये विदर्भासह महाराष्ट्रावर सतत अन्याय झाला. यामुळे बुलढाणा जिल्हा मागास राहिला. मात्र, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे महायुतीचे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सिंदखेडराजासाठी राबविलेला विकास आराखडा, शेगावचा विकास आराखडाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. मतदानातून जिल्ह्यातील भाजपा – शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

अमित शहा यांचे भाषणा सुरु होण्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री व जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवार डॉ. संजय कुटे यांचे प्रास्ताविक झाले. त्यांनी आपल्या भाषणातून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य सरकारने जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचे सर्व उमेदवार डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), चैनसुख संचेती (मलकापूर), आकाश फुंडकर (खामगाव), श्वेता महाले (चिखली) व शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) व संजय गायकवाड यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, सभेचे निमंत्रक सतीश गुप्त, सुरेशअप्पा खबुतरे, जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल, संतोष देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, रयत क्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, संजय चेके पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शेख अनीस, चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, उपनगराध्याक्षा वजीराबी शेख अनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. अमित शहा यांच्या हस्ते शहीद नितीन राठोड, शहीद नितीन राजपूत आणि शहीद अनिल वाघमारे या जिल्ह्यातील हुतात्मा लष्करी जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.