
निवडणूक आयोगाला ईव्हीएममधील घोटाळे कळत नाहीत हे दुर्दैव आहे. कारण लोकसभेत भाजप विजयी होते आणि त्यापाठोपाठ काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस निवडून येते हे न उलगडणारे कोडे आहे अशी टीका राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ‘आदिवासींचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी सोडून गेलो असे सांगतात, मग 40 वर्षे काय गवत उपटत होतात काय, असा टोला मधुकर पिचड यांचे नाव न घेता पवार यांनी लगावला.
अकोले येथील प्रचारसभेत शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की, आमच्याकडे पाठीला तेल लावून पैलवान बसलेले आहेत पण समोर तुल्यबळ पैलवान नाहीत. पण त्यांना माहीत नाही की मी महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्ती, क्रिकेट अशा अनेक खेळांची व त्यातील डावांची मला माहिती आहे. फडणवीसांना कोणी तरी हेही सांगा की, कुठेही कुस्ती खेळायची नसते आणि आम्ही फक्त पैलवानांशीच कुस्ती खेळणारे खेळाडू आहोत. नाही ते बोलत बसू नका, असे पवार म्हणाले. आमच्याकडे पैलवान नाही म्हणता, मग देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री महाराष्ट्रात धरण पाहायला आले आहेत काय, असा खोचक सवालही त्यांनी केला.
केंद्रातील सरकार सर्जिकल स्ट्राईक, जवान आणि त्यांचे राजकारण करीत आहे. सीमेवर जवानांचा जीव जातो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना त्यांचे काहीही नाही. सर्जिकल स्ट्राईक जवानांनी केला, मात्र त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी व अमित शहा घेत आहेत अशी टीका पवार यांनी केली.





























































