
माथेरानचा संपूर्ण आर्थिक गाडाच अवलंबून असलेल्या मिनी ट्रेनला पुन्हा ‘अमन लॉज ते माथेरान’ अशा शटल सेवेच्या स्वरूपात चालविण्यासाठी मध्य रेल्वेने कलेक्टरकडे जमिनीची मागणी केली आहे. माथेरानची शटल सेवा सुरू करण्यासाठी या मिनी ट्रेनची देखभाल करण्यासाठी घाटमाथ्यावर वरच्या बाजूला ‘पिटलाइन’ बांधावी लागणार असल्याने येथील झाडांची देखील कत्तल करावी लागणार आहे.
यासंदर्भात स्थानिकांच्या शिष्टमंडळाशी मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकार्यांनी सोमवारी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी ‘अमन लॉज ते माथेरान’ ही शटल सेवा निदान तातडीने सुरू करा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी नेरळ ते माथेरान या 20 कि.मी.च्या संपूर्ण मार्गावर 21 ठिकाणी ट्रकला दरडी कोसळणे, भूस्खलनाने मोठे नुकसान झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. तसेच अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करायची झाली तरी 2 कि.मी.च्या या रेल्वे मार्गाच्या संचलनासाठी डब्यांची व इंजिनाची देखभाल यंत्रणा जी सध्या नेरळमध्ये उपलब्ध आहे ती घाटमाथ्यावर वरच्या बाजूला नेण्याची गरज असून तेथे गाडीच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी ‘पिटलाइन’ बांधण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे जमिनीची मागणी केली आहे.
अतिवृष्टीने 9 ऑगस्टपासून मिनी ट्रेन सेवा ठप्प
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे माथेरानच्या नेरळ ते माथेरान या मार्गावर 21 ठिकाणी ट्रकखालील माती व खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेने 9 ऑगस्टपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ‘अमन लॉज ते माथेरान’ ही शटल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर स्थानिकांनी ही शटल सेवा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली असून ‘रेल रोको’ करण्याचाही इशारा दिला होता.
टेंडरला प्रतिसादच नाही!
दोन कि.मी.चा ‘अमन लॉज ते माथेरान’ हा मार्ग दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याचे टेंडर काढण्यात आले असून त्यास अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यामुळे आता 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा टेंडर काढण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिकांपैकी कोणी कंत्राटदार हे काम करायला तयार असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी माथेरानवरून आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले.























































