
शनिवार, रविवारची सुट्टी आली की मद्यप्रेमींना खुणावू लागते ती थंडगार बियर. जगभरात सर्वाधिक प्यायला जाणारा मद्य प्रकार म्हणजे बियर. युरोपात होणारे फुटबॉल लीगचे सामने असोत, अथवा इंग्लंडच्या जगविख्यात मैदानांवर होणारे क्रिकेटचे उत्कंठावर्धक सामने, फेसाळणाऱ्या बियरचे चषक हातात घेऊन त्यांचा आस्वाद घेणारे असंख्य प्रेक्षक आपण पाहात असतो. आता लवकरच बियर ही काचेच्या बाटली ऐवजी चक्क कागदी बाटलीत मिळणार आहे. काय वाचून विचारत पडला ना? मात्र हो हे खरं आहे. बियरनिर्मिती करणारी कंपनी जगात प्रथमच पेपर फायबरचा वापर करून बियरच्या बाटल्या तयार करण्याचा निर्णय घेतला असून या बाटल्यांचे दोन नमुने नुकतेच कंपनीने सादर केले आहेत. या बाटल्या ग्रीन फायबर बॉटल या नावाने जगभरात वितरित करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कार्ल्सबर्ग ग्रुपने वर्ष 2030 पर्यंत आपल्या सर्व ब्य्रुअरीजमधून कार्बन उत्कर्षणाचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांच्या व्हॅल्यू चेन कार्बन फुटप्रिंटचे प्रमाणही 30 टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले आहे. या पेपर फायबर बाटल्यांची निर्मिती हा याच शाश्वत विकास योजनेचा एक भाग आहे. यासाठी कंपनीने दोन नमुने सादर केले आहेत. या दोन्ही नमुन्यांची खासीयत अशी की हे पूर्णपणे रिसायक्लेबल असून याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. कागदाच्या बाटलीचे हे दोन्ही नमुने पॉलिमरमुळे बियर साठवण्यासाठी योग्य आहेत. यातील एका नमुन्यामध्ये पुनर्वापर करण्यास उपयुक्त असा असलेला पातळ असा पेट पॉलिमर फिल्म बॅरियर वापरला असून दुसऱ्या नमुन्यामध्ये 100 टक्के बायो बेस्ड पीईएफ पॉलिमर फिल्म बॅरियर बसवण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान पुढे विकसित करण्यात येत असून बियरची बाटली 100 टक्के रिसायक्लेबल करण्यासोबत त्यातून पॉलिमरचा वापरही बंद करण्याचा कार्ल्सबर्ग समूहाचा निर्धार आहे.
“संपूर्ण नव्या पद्धतीची पर्यावरणपूरक बियरची बाटली विकसित करण्याचा अंतिम टप्पा जरी अद्याप आम्ही गाठला नसला तरी हे दोन नमुने म्हणजे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. असे नाविन्यपूर्ण शोध लावण्यास नेहमीच वेळ लागत असतो. मात्र या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे मत कार्ल्सबर्ग समूहाच्या उत्पादन विकास विभागाच्या उपाध्यक्षा मरियम शिंगल्टन यांनी व्यक्त केले आहे.




























































