
>> वरद चव्हाण
शेफ पराग कान्हेरे. घरात व्यायामाचा वारसा आणि हातात स्वादाची कला. दोन्हीचा उत्तम सुवर्णमध्ये राखत परागने स्वतःला फीट ठेवलंय.
नमस्कार फिटनेस फिक्स! आत्तापर्यंत मी मुलाखत घेतलेल्या प्रत्येक कलाकारांनी अथवा खिलाडूंनी ते स्वतःचा आहार कसा नियंत्रणात ठेवतात, कसा मोजून-मापून खातात, कसा बाहेरचं खाणं टाळतात, कसा एका आहारतज्ञाच्या मदतीने स्वतःचा आहार व जेवणाच्या वेळा ठरवतात हेच तुम्ही वाचत आलात. पण जर तुमचं प्रोफेशनच मस्त चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्याचा असेल तर विचार करा! सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणानंतरच्या डेझर्टपर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थांनी तुम्हाला चहुबाजूंनी घेरलेले आहे. त्यातले अनेक पदार्थ तुम्ही स्वतःच्या हातानी बनवलेत. शाकाहारीपासून मांसाहारीपर्यंत, गोड पदार्थांपासून तिखट पदार्थांपर्यंत इतकी विविध जेवणाची मेजवानी असताना स्वतःच्या भुकेवर ताबा ठेवण एक मोठ आव्हान असेल नाही का? आणि म्हणूनच आजचे आपले सेलिब्रिटी कलाकार आहेत प्रसिद्ध शेफ प्रराग कान्हेरे! परागचे आजोबा पैलवान होते व परागचे बाबा सॉफ्टबॉलचे खेळाडू होते. सॉफ्टबॉल हा अमेरिकेच्या बेसबॉल या खेळासारखाच एक खेळ असतो. फरक इतकाच की, सॉफ्टबॉलचा चेंडू बेसबॉलच्या चेंडूपेक्षा थोडा मोठा असतो. याशिवाय पुणेश्रीसारख्या बॉडिबिल्डिंगच्या स्पर्धेतसुद्धा परागच्या बाबांनी पारितोषिके पटकावली आहेत.
आजोबा आणि बाबांमुळेच घरात व्यायामाचं वातावरण होतंच. म्हणून कदाfिचत परागच सदसदीत असण हे त्याच्या जिन्समध्येच आहे असं बोलायला हरकत नाही. पराग स्वतः क्रिकेट या खेळाचा खूप चाहता आहे. यामुळे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी फिटनेस रुटीन त्याला नेहमीच करावं लागत होतं. पण हॉस्पिटॅलिटी इण्डस्ट्रीमुळे परागच्या आयुष्यात फिटनेसचं महत्त्व वाढलं. शेफचं काम दिसतं तेवढं सोपं नसतं. लाँग वर्किंग अवर्स असतात. सतत उभं राहावं लागतं. ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते. यामुळे शारीरिक व मानसिक ताण खूप असतो. कुठल्याही शेफचं विश्व चार भिंतींपलिकडे नसून आणि म्हणूनच किचनच्या बाहेर पडून पुन्हा व्यायामशाळेत जाणं कोंडल्यासारखं वाटतं. म्हणून फिटनेससाठी व्यायामशाळेत जाण्यापेक्षा कुठल्याही गार्डनमध्ये किंवा जॉगिंग ट्रक्सवर चालणं किंवा जॉगिंग करण परागला जास्त आवडतं. याशिवाय मन शांत ठेवण्यासाठी पराग योगासुद्धा करतो. परागचं ठाम मत आहे की, आपण स्वतःला जेव्हा आरशात बघतो ते बघून आपणच ठरवायचं असतं की, मला या रूपात बाहेर फिरायला आवडेल का? तुम्ही फिट आहात की नाही हे सांगायला कोणालाही जिम ट्रेनरची गरज नसते. आपण स्वतःलाच प्रश्न विचारून त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आपला मेटाबॉलिझम रेट काय आहे हेसुद्धा जाणून घेतल्यास आपल्याला जिमला जायची गरज नाही. आपलं जेवण झाल्यावर किती वेळाने आपल्याला दीर्घशंकेला जावं लागतं. यावरून आपल्याला आपला मेटाबॉलिझम रेट कळतो. याशिवाय आपला आहार काय असावा, यासाठीसुद्धा कुठल्याही डायटिशियनची गरज नाही. आपल्या पूर्वजांनीच आपआपल्या परंपरेप्रमाणे व महाराष्ट्राच्या विविध भागांनुसार न्यूट्रिशियन डायट कधीच डिझाईन केलंय.
घरातलं जेवण जेवलो तर काही प्रॉब्लेम येत नाही. चरबी जंक फूडमुळे येते. जंक फूड खावं पण जरा कंट्रोल ठेवून हे त्याचं ठाम मत आहे. उदा. पाणीपुरी खायला गेल्यावर तीन-चार प्लेट पाणीपुरी खाऊ नये. एक प्लेट खाऊन समाधानी राहायलो तर आपल्यालाच त्याचा फायदा होईल. पराग स्वतः इतकं चमचमीत पदार्थ बनवतो, तर त्यावर कधी ताव मारावासा वाटत नाही का? हा प्रश्न मला विचारायचा होताच आणि प्रश्न विचारल्यावर अप्रतिम उत्तर मला मिळालं ते म्हणजेच खाणं आणि ताव मारणं यात खूप फरक आहे. जर आपण आपल्याला आवडत असलेला पदार्थ खाल्ला तर त्याचा त्रास आपल्याला कधीच होत नाही, पण जर त्या पदार्थावर ताव मारला तर त्याचं रूपांतर जाडेपणात होतं. आज जसा प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी कुटुंब मन्थली बजेट आखतो, पैशांचं सेव्हिंग कसं करता येईल याकडे त्याचा कल असतो. तसाच आपण आपल्या कॅलरीज्चासुद्धा हिशेब ठेवायला हवा. फक्त पैशांप्रमाणेच कॅलरीज् शरीरात सेव न करता त्या कॅलरीज् बर्न कशा करता येतील याचा विचार करायला हवा.
परागला त्याच्या चाहत्यांना सांगावंसं वाटतं की, व्यायामशाळेत नाही गेलात तरी चालेल पण शरीराला चालणं हे हवंच. रोजचे निदान दहा ते पंधरा मिनिटं चालायलाच हवं. याशिवाय आपण सगळय़ांनीच परागचे अभिनंदन करायला हवं. आपण नेहमीच ऐकत आलोय की, ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे. यात काहीच वाद नाही. पण परागनी अलीकडेच स्वतःच्या पुतण्याला स्वतःची एक किडनी डोनेट केली आहे. ऑपरेशन झाल्यानंतर आठव्या दिवशीच परागने मुंबई ते गोव्याचा प्रवास रेल्वेने केला. त्याला त्याच्या वर्कप्लेसला जाणं अत्यंत गरजेचं होतं. मग साधारण एक-दोन महिन्यांतच डॉक्टर्सचा सल्ला घेऊन व थोडा व्यायामाचा आधार घेऊन पराग परत स्वतःचं नॉर्मल आयुष्य जगू शकला. आपण प्रत्येकानेच परागला एक आदर्श मानून आपण इतर माणसांच्या आयुष्यातला त्यांनी गमावलेलं हास्य परत आणू शकतो का याचा विचार करायलाच हवा!





























































