
>> संजीवनी धुरी-जाधव
हिंदुस्थानी भाषांची वैविधता आणि समृद्धी जगभरात पोहोचवण्यासाठी गायिका मंजुश्री ओक यांनी ‘अमृतवाणी’ या कार्यक्रमातून एक वेगळा प्रयत्न केला आहे. त्याविषयी त्यांच्याशी केलेली बातचित.
सांगीतिक वारसा असलेल्या कुटुंबात गायिका मंजुश्री ओक यांचा जन्म झाला. वडील वसंत ओक उत्तम गायक, वादक, कवी, संशोधक होते आणि आई कलाप्रेमी. बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणात त्या लहानाच्या मोठय़ा झाल्या. जन्मापासूनच संगीत कानावर पडत गेले. यंदाचे वर्ष युनोने स्वदेशी भाषा वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअंतर्गत नुकताच त्यांनी 122 भाषांमध्ये तेरा तासांचा ‘अमृतवाणी’ हा अनोखा कार्यक्रम केला. या अनुभवाविषयी मंजुश्री ओक सांगतात की, कार्यक्रमाचा अनुभव थ्रिलिंग होता. याआधी सलग पंधरा तास गायले असल्याने तेरा तास गायल्याचे काही वाटले नाही. मुळात तासांचा यावेळेला हिशेब नव्हता. कारण याआधी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ असे दोन रेकॉर्ड झाले आहेत. एकदा बारा आणि एकदा पंधरा तास गायले होते. हा विषय 122 भाषांचा होता. शिवाय महत्त्वाचा होता. संपूर्ण हिंदुस्थानात बोलल्या जाणाऱया भाषा या पूर्णपणे हिंदुस्थानी आहेत. त्या मांडायच्या त्याही एका वैश्विक भाषेतून. हे आव्हान होतं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
पुढे त्या सांगतात की मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी याव्यतिरिक्त बंगाली भाषा आधी कानावर पडली. वडील संगीतप्रेमी आणि गायक असल्यामुळे नंतर मंगेशकरांच्या ‘मीरा’ आणि ‘गालीब’ या रेकॉर्ड घरी आल्या. मग मेवाडी आली, त्यानंतर उर्दू पण आली. पूर्वी ब्लॅक ऍण्ड व्हाईट टीव्हीवर रिजनल फिल्म लागायच्या. त्यावेळी 1980 मध्ये ‘शंकराभरणम्’ संगीतावर आधारित असलेला सिनेमा आला होता, वडिलांनी माझ्या बऱयाच खटपटी करून रेकॉर्डरवरती अख्खा सिनेमा रेकॉर्ड केला होता. संगीतावर आधारित असल्याने जितके ऐकता येईल तितके ऐकायला सांगितले. त्यातले संगीत ऐकण्यासारखे आहे. त्यातले ते संगीत ऐकून ऐकून जवळजवळ सिनेमा पाठ झाला होता. तेव्हा ही भाषेची पार्श्वभूमी तयार होती. मुळात माझ्यासाठी भाषा हे बर्डन नव्हते, पण 122 भाषा ज्या कधी ऐकल्याही नव्हत्या, त्या सगळ्या समाविष्ट केल्या होत्या, ते आव्हान होतं.
संगीतातून भाषेची विविधता
मुळात हिंदुस्थानी संगीताची परंपरा ही युगानुयुगे चालत आलेली आहे. देशाने आपल्याला आतापर्यंत इतकं काही दिलेलं आहे की, आपण देशाला परत काय देऊ शकतो, तर मी संगीताच्या माध्यमातून देशाचे नाव जगात पोहोचवू शकते हे मला पक्के माहीत आहे. मग याबरोबर काय करता येईल हे मला ठाऊक आहे. संगीताच्या प्रांतामध्ये जेव्हा बंदिशी म्हणतो, गाणी म्हणतो, इतके वेगवेगळे प्रकार त्यात येतात, पंजाबी टप्पा येतो, उर्दू गझल असतात किंवा बंदिशीसुद्धा कित्येकदा हिंदीत असतात, अवधी भाषेत असतात. काही वेळेला साऊथ इंडियन रचना म्हंटल्या जातात. त्यामुळे हे जे भाषावैविध्य आहे ते जगात इतरत्र कुठेही नाही. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा या विषयात विचार सुरू झाला. इथे भौगोलिक विविधता जितकी आहे तितकीच संगीतात, तितकीच भाषेमध्येही आहे. आपल्याकडे बारा मैलांवर भाषा बदलते. तर या भाषेच्या विविधतेतून आपण संगीताची आणि भाषेची विविधता मांडू शकतो हे जेव्हा लक्षात आले तेव्हा ही संकल्पना सुचली. याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, हे जगात पोहोचले पाहिजे आणि जेव्हा या विषयाची खात्री पटली तेव्हा अशा प्रकारचा एकमेवाद्वितीय कार्यक्रम नक्कीच होऊ शकतो, असे जाणवले आणि त्यादिशेने प्रयत्न केल्याचे त्या सांगतात.
हे टीमवर्क आहे…
कार्यक्रम करताना संगीताच्या दृष्टीने काही अडचणी येत नाहीत. संपूर्ण अभ्यास केलेला असतो. संगीतकारांची माझी टीम आहे, जी गेली दोन वर्षे सातत्याने असते. हे तिसरे वर्ष. ते ऑल सेट आहेत, त्यांनाही याची कल्पना आहे, हे टीमवर्क आहे आणि संपूर्ण देशासाठी करतोय याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे संगीताच्या दृष्टीने आम्हाला कुठेही अडचण आली नाही. तेरा तास तिथे मला गायचे आहे, सांगीतिकदृष्टय़ा तिथे वेगवेगळे फॉरमॅट मांडायचे आहेत. त्याचा अभ्यास, यासाठी लागणारी मानसिक तयारी, शारीरिक आणि संगीताची तयारी ही सुरूच असते. रियाज हा चोवीस तास आहेच. जेव्हापासून गातेय तेव्हापासूनच सतत म्युझिकमध्ये असणं हेच आयुष्य आहे. सकाळी उठल्यावर रेडिओ सुरू होतो आणि झोपताना रेडिओ ऑफ होतो हेच एक गायक म्हणून फार महत्त्वाचं असतं. आपण काम करताना संगीत बाजूला लावून ठेवणं हे नकळतपणे आपल्यात भिनत असतं. तेरा तासांसाठी तेरा महिने काम करतेय असं नसतं. ते अगोदरपासून अंगात भिनलेलं असतं. संगीत पॅशन आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात असेही मत त्या व्यक्त करतात.
गीतांची निवड
काळजीपूर्वक गाण्यांची निवड केली. त्यासाठी अनेक माध्यमांची मदत घेतली. त्यात पुस्तके, जुन्या कॅसेट्स, सोशल साईट्, टीव्हीवरची काही रेकॉर्डिंग क्लिपिंग्स होती. तर यातील तीस गाणी मी नवीन केली. 122पैकी तीस गाणी पूर्णपणे नवीन होती. चार स्लॉटमध्ये हा कार्यक्रम झाला. श्री यशलक्ष्मी आर्टचे पद्मनाभ ठकार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मिलिंद वेर्लेकर, ओम वेर्लेकर यांनी गिनीजसंदर्भात कन्सल्टन्सी केली. जनगणना मुंबई कार्यालय, पुणे विद्यापिठ, टीआरटीआय इन्स्टिटय़ूट यांची मदत मिळाली. खय्याम साहेबांना जेव्हा कार्यक्रम करत असल्याचे कळले तेव्हा अक्षरशः पाचव्या मिनिटाला त्यांनी पाच भाषांतील पाच गाणी सुचवली होती. त्यामुळे मदत करणारे लोक खूप भेटले, अशी भावना मंजुश्री ओक व्यक्त करतात.

























































