
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रोळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी खासदार संजय दीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.इतक्या मोठय़ा संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ यांना मोठा धक्का बसला आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विक्रोळी तालुकाध्यक्ष प्रशांत दास, मामा मंचेकर, अल्पसंख्याक मुंबंई उपाध्यक्ष अमजद शेख, अनिल शिरोडकर, विक्रोळी उपाध्यक्ष प्रकाश सोनमळे, विक्रोळी महिला तालुकाध्यक्षा सुशीला मंचेकर, जया व्यंकटगिरी, बचतगट नेत्या विद्या शेवाळे, मनीषा पाटील, धनश्री पाटील, स्वाती नांगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव, नगरसेवक उपेंद्र सावंत, शिवसेना – भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नेपाळी भाषिक मतदार शिवसेनेच्या पाठीशी
मुंबईत नेपाळी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय असून या सर्व मतदारांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. चंपासिंह थापा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेपाळ आणि नेपाळी श्रमिक मजदूर युनियन (हिंदुस्थान) यांच्या वतीने संयुक्तपणे ‘विधानसभा निवडणूक 2019’ चे प्रचार अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रचारात संघटनेचे अध्यक्ष बलबहादूर भाटक्षेत्री, सरचिटणीस दीपक सिलाल, झंकर भाट, दिलीप थापा, शिवसेना नेपाळ संपर्कप्रमुख अशोकसिंह नेपाली, लोगे सुनार, कल्पेश सिंह यांच्यासह मोठय़ा संख्येने नेपाळी भाषिक समाजाची उपस्थिती होती.



























































