कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर घातले बॉक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थी कॉपी करत असल्याने हा गैरप्रकार रोखण्यासाठी शाळा-कॉलेज प्रशासन अनेक क्लृप्त्या वापरत असतात. याचपार्श्वभूमीवर काहीवेळा विद्यार्थ्यांना वर्गात येताना मोबाईल, रुमाल, पुस्तक. चपला, बूट, घड्याळ आणण्यास मनाई केली जाते. पण कर्नाटकमधील भगत प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजने विद्यार्थ्यांना कॉपी करता येऊ नये म्हणून अजीबच शक्कल लढवली आहे. कॉपी करता येऊ नये म्हणून चक्क विद्यार्थ्यांच्या डोक्यात बॉक्स घालण्यात आले.या घटनेचा फोटो व्हायरल झाला असून याप्रकरणी राज्य सरकारने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच शाळेचा परवाना रद्द करण्याचा विचार करत आहोत असेही या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर या फोटोने खळबळ उडवून टाकली आहे. यात एका वर्गात विद्यार्थी डोक्यात पुठ्ठ्याचे बॉक्स घालून पेपर लिहत असल्याचे दिसत आहे. डोक्यात बॉक्स घातल्याने विद्यार्थी आजुबाजुला बघु शकणार नाहीत, कोणाशी चर्चाही करु शकणार नाही हा यामागचा उद्देश्य होता. असे शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. हा गंमतीदार फोटो बघून अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. गंमत म्हणजे परिक्षेच्या वेळी कॉपी करू नये म्हणून आपल्याला डोक्यात बॉक्स घालायला सांगणार हे विद्यार्थ्यांनाही माहीत नव्हते. ते जेव्हा परिक्षा देण्यासाठी वर्गात आले तेव्हा शिक्षकांनी त्यांना डोक्यात हे बॉक्स घालायला सांगितले. बॉक्समध्येच डोके अडकल्याने विद्यार्थ्यांना आजुबाजुलाही बघता येत नव्हते. मुलांना पेपर दिसावा यासाठी दोन छित्र बॉक्सवर करण्यात आली होती. त्यामुळे मुलांचे लक्ष फक्त पेपर सोडवण्याकडे होते.