
कर्नाटकमधील बंगळुरू येथे एका स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुचा आयकर विभागाने पर्दाफाश केला आहे. कल्कि भगवान, अम्मा भगवान या नावाने हा अध्यात्मिक गुरू भाबड्या जनतेकडून देणगी वसूल करायचा व तोच पैसा रियल इस्टेटमध्ये गुंतवून माया जमवत असल्याचे समोर आले आहे. या भगवानच्या आश्रमावर आयकर विभागाने छापा घातला असता रोख 93 कोटी रुपये, परदेशी चलन आणि सोने अधिकाऱ्यांच्या हाती लागले. तसेच इतर आश्रमात या गुरुंची 409 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,भगवान यांच्या आश्रमाने सर्व आरोप फेटाळले आहेत.

याबद्दल एका हिंदी वाहीनीने वृत्त दिले आहे. त्यानुसार भगवान गुरू हे एक असाधारण व्यक्ती होते. त्यांचे खरे नाव विजय कुमार असून लाइफ इंश्योरेंस कॉरपोरेशन मध्ये ते क्लार्क या पदावर काम करत होते. भगवान यांनी 1980 साली स्वत:ची संस्था स्थापन केली. त्याला जीवाश्रम स्कूल असे नाव दिले. तसेच चित्तूर येथेही विद्यापीठ सुरू केले. 1990 मध्ये त्यांनी स्वत:ला विष्णूचा 10 वा अवतार म्हणून घोषित केले. नंतर पत्नी पद्मावती व मुलगा एनकेवी कृष्णा यांनाही परमेश्वराचे अवतार म्हणून सांगितले. त्यामुळे भोळे भाबडे भाविक त्यांना देव मानू लागले. भक्तांच्या याच श्रद्धेचा गैरफायदा घेत भक्तांमार्फत त्यांनी देशाबरोबरच विदेशातही आपले जाळे पसरवले. समाजसेवेच्या नावाखाली भक्तांकडून मोठ्या देणग्या वसूल करू लागले. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी भक्तही सढळ हाताने देणग्या देत होते. त्यासाठी त्यांनी काही भक्तांची नेमणूक केली. जे भगवान यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार करत. त्यानंतर भगवान यांनी समाजकार्याच्या नावाखाली अनेक सेंटर सुरू केले व त्यातून काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सुरू केला. भक्तांकडून येणाऱ्या देणग्यांमधुन ते बांधकाम क्षेत्रात उतरले. रियल इस्टेटमध्येही त्यांनी चढ्या भावाने जमिनी विकून माया गोळा केली. नंतर त्यांना भाविक अम्मा भगवान संबोधू लागले. अशा प्रकारे या जोडप्याने कोट्यवधीची संपत्ती जमवली.
आयकर विभागाला याची भनक लागताच भगवान आणि त्यांच्या मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील 40 ठिकाणांवर छापा मारण्यात आला. एकाचवेळी हा छापा भगवान यांच्या चैन्नई, हैदराबाद, बंगळुरु, वरादियापालन येथे टाकण्यात आला. त्यावेळी भगवान यांची संपत्ती बघून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले.
























































