बंद मुठीतलं फुलपाखरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

पहाटेनं शुभ्र लाटांमध्ये नाहून सूर्याचा लखलखता टिळा कपाळीवर टेकवला न् ती डौलात पाऊल टाकून चालू लागली. रस्ते धावू लागले… गाडय़ांनी माणसांची पिलावळं कडेवर डोक्यावर खांद्यावर घेतली न् त्याही भराभर पळू लागल्या…

एक प्रचंड घडय़ाळ सुरूच… वेळेचं… काळाचं… भुकेचं… कामाचं… मीही यातला एक खिळा होतो प्रचंड चक्रातला- काळ-काम- वेगाचं गणित लहानपणी मला यायचं नाही. आताही ते जमत नाही. पण कायाय की गाडी पकडायची असली की आपण फक्त गर्दीत घुसायचं असतं की गर्दी आपोआप तुम्हाला आत ढकलत ढकलत गाडीच्या आत टाकते! तसं महानगराच्या प्रचंड कालचक्रात फक्त घुसायचं तुम्ही आपोआप धावत फिरत पळत रहाता इतरांबरोबर…

– सगळय़ांना बस पकडायची असते- ट्रेन पकडायची असते न् कुठंतरी जायचं असतं…

तो कुत्राही पहा… लेटमार्क होऊ नये म्हणून नोकरीवर धावत भरभर जाणाऱया माणसासारखा घाईघाईनं चाललाय… अगदी डावी उजवीकडे नीट पाहून सराईतपणे रस्ता क्रॉस करून गेलाही!

चायवाले-हॉटेलवाले ताजेतवाने उत्सुक वाफा-चहाच्या… नाश्त्याच्या… जेवणाच्या… निघून कामावर जाणाऱया लोकांना वाफाळ घमघमाटाच्या बोटांनी बोलावत होत्या…

बसस्टॉपवर एका पायाचा भार दुसऱयावर टाकत माणसं उभी… बसचं लाल डोकं दिसल्यावर पुत्रजन्माचा आनंद होऊन ते आनंदानं पुढं सरसावत…

बिल्डिंगमधले फ्लॅट… चाळीतल्या खोल्या- अगदी झोपडपट्टीतल्या खोपटय़ा लगबगीनं कामाला लागलेल्या… हे प्रचंड गतिमान वेगवान कामसू शहर धावणारं सतत धडाडणारं इंजिनागत राक्षसी ऊर्जा जिवंत चैतन्यमयी न् कधी क्रूर अमानुष तर कधी मानव्याचा मऊ स्पर्शानं कनवाळू… केवढी रूपं ही… याला व्याखेत बसवणं सोपं नाहीच.

किंबहुना माणसाप्रमाणेच महानगर शहरालाही व्याख्येत बद्ध करणं कठीण. जीवनाइतकेच विविध रंग त्याचे.

– कुक् कुक् कुक्… पिठाची गिरण कोंबडय़ागत बांग देते…

लांबवर पसरलेला हिरव्यागार शेताचा गालिचा न् त्यावर झळकणारा निरभ्र आकाशाचा भला थोरला नतवा न्  त्यावर लखलखणारी सूर्याची भाकरी…

पोपटांचा उडणारा हिरवा थवा… पाखरांचा किलबिलाट- प्रसन्न वाऱयाच्या पहाटधुळका ताह्या मुलाच्या निर्व्याज हसण्यागत… काळी मातकट मातीची ढेकळं पायाला खुपत नाहीत. विहिरीला लावलेल्या पंपाचा पाण्याचा झोत हत्तीच्या दहा सोंडेइतका तरीपण ते अंगावर घेताना रोमारोम फुलतं…

दूरवर बाया पाण्याला जातायत… कुठलंतरी पोरं म्हशीवर बसून गुरं राखोळीला अगर पाण्यावर नेताना… काही पोरं थैली पाठीवर टाकून तरतरीतपणे ‘साळंला’ जाताना… ओडय़ाचं पाणी पावलांशी पिंगा खेळत… गुदगुल्या करतं…

‘करकर बोलत काटे खाय

पाण्याला बघून उभी राह्य’ सांगतं सांग

हरलो…. वहाणा!

वढय़ाला पार करताना व्हाणा हातात घेत्यात ना लोकं!

गाव ते शहर खूप लांबचा पल्ला- यंत्र ते जिवंत खळाळती मन-झऱयागत ते चैतन्यमयी निसर्ग… एकाकडे विकासाचा मुखवटा न् दुसरा अनलंकृत खरा चेहरा अस्सल… त्या चेहऱयाला धूळ माती चिकटलीय… घामाचे थेंब थरथरत चमकतायत… पण… या अस्सल चेहऱयाला अनलंकृत पण म्हणता येणार नाही. खळाळत्या नद्या झऱयांचं निरागस हास्य आहे… हिरव्यागार रानाचे झाडांचे शेतांची झळझळणारी वरच पैठणीलापण लाजवणारी… पाखरांची मंजुळ किलबिल- भाकरी थापताना कुण्या लक्ष्मीची किंवा आईची वाजणारी काकणं… किणकिण.. कंदिलाचा मंद प्रकाश… जित्रापांच्या डोळय़ात तेवणारे रातदिवे… काजव्यांचे चमचम उडणारे दिवे… आकाशात नवयौवनेच्या डोळय़ातल्या स्वप्नागत लखलखणारे तारे… हे सारं वैभव अंगावर पांघरणाऱया गावाचा चेहरा अनलंकृत कसा म्हणावा?

– ही दोन्ही रूपं वेगवेगळी… आयुष्य जीवनाचं अविभाज्य अंग. आपण आपल्या सोयीनुसार स्वीकारतो आणि नाकारतो… प्राथमिकता ही एक गोष्ट. बदली झाली की आपण एक तर गावी जातो किंवा शहरात… जुळवून घेणं ही आपली सनातन प्रवृत्ती आपण होऊन जातो जिराफ! उंच मान करून खाता खाता उंचच मानेच्या पिढय़ा निपजणारे जिराफ! किंवा आपण होऊन जातो शिकाऊ चिंपाझी… सर्कशीत सायकल चालवणारे! आपल्याला काय हवं- आपण कोण आहोत- न् आपल्याला काय हवं आहे न् काय असायला हवं हे आपण विसरून जातो!

आपण होऊन जातो शहरातला एक ठोकून बसवलेला खिळा-क्रू- किंवा चक्र! किंवा आपण होऊन जातो गावातलं एक खुरांनी पाणी- धूळ उडवत शिंग हलवत घरी परतणारं जनावर… किंवा अनाम धूळ जसं की प्रचंड ब्रम्हांडातलं पृथ्वीचं अस्तित्व एक अनाम धुळकण जसं आहे तसचं…

काय आहे आणि काय असावं यातला फरक जाणणारा प्राणी म्हणजे माणूस ही गोष्ट आपण विसरून चाल्लोय… आता काय मिळतं न् काय मिळायला पाहिजे न् त्यासाठी काय करायला पाहिजे या तडजोडी निमूट स्वीकारणारा प्राणी म्हणजे माणूस! असं समीकरण जे झालय ते किती बरोबर न् किती चूक याचाच हिशेब करायचा बाकी!

पोट आणि भावना- शहर आणि गाव… साक्षरता- निरक्षरता-गरीब- श्रीमंत- यात काय महत्त्वाचं? सुसंस्कृतपणा कशाला म्हणावं? हे सारे प्रश्न आपल्याला पडत नाही. सतावत नाही… आपल्या बंद मुठीत कायाय? एक हिरवागार श्वास की गुदमरलेला यांत्रिक आवाज? की आपल्याला बंद मूठ उघडायचीच नाहीय?

‘बंद मुठ्ठी लाखकी खुली तो होगी खाककी!?’

-खूप लांबवर चाल्लो… मागे शून्य… पुढेही निःशब्द शून्यच. शून्यात अर्थ भरायला आपण किती समर्थ आहो…

-गाव -शहर… यांचं थर्मामीटर-बॅरोमीटर- स्मिसोग्र्राफ कितीका असेना- कुणीतरी यांच्या थेट हृदयावरच स्टेथोस्कोप ठेवाना? किती न् कसं धडधडतय ते? त्याला हार्टऍटॅक येणाराय् का पूर्ण आजारी आहेत ही शहरं न् गाव?

पाऊस- शेती- उत्पन्न-

उत्पन्न- फायदा- भांडवल- नफा-

कर्ज- नुकसान- सावकार- बँका-

घर- गाडय़ा- तोटा- घायकुतीला आलेले सर्व जीव- महानगरात असो वा गावात-

पाऊस कधी महाभयंकर पडेल किंवा अजिबातच येणार नाही. दोन्ही संकटं- काम करा न् कर्जात डूबा पैशे येणार की नाही- माहीत नाही- सगळीकडे रिस्क कोण आकांत करतय- ही हिरवीगार गर्जना कोणाचीय! ही आर्त जिवघेणी किंचाळी कोणाचीय? जंगलातून आलेली? मी कानावर हात ठेवतेय- मला ऐकवत नाही- मला ऐकवत नाहीत-

गाव ते शहर खूप लांबचा पल्ला- यंत्र ते जिवंत खळाळती मन-झऱयागत ते चैतन्यमयी निसर्ग… एकाकडे विकासाचा मुखवटा न् दुसरा अनलंकृत खरा चेहरा अस्सल… पोट आणि भावना- शहर आणि गाव… साक्षरता- निरक्षरता-गरीब- श्रीमंत- यात काय महत्त्वाचं? सुसंस्कृतपणा कशाला म्हणावं? हे सारे प्रश्न आपल्याला पडत नाही. सतावत नाही… आपल्या बंद मुठीत कायाय? एक हिरवागार श्वास की गुदमरलेला यांत्रिक आवाज? की आपल्याला बंद मूठ उघडायचीच नाहीय?

– [email protected]