
पुणे ते सोनवळा (ता. जळकोट जि. लातूर ) असा शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन करून गणेश अण्णाराव मुसळे या तरुणाने आपल्या गावात मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी अनोख्या पद्धतीने त्याने कृतीतून जनजागृती केली. त्यामुळे गणेश मुसळे याचे जळकोट तालुक्यातून कौतुक होत आहे.
बरेच मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत. मतदानाच्या सुटीचा लाभ घेत सहलीसाठी बाहेरगावी जातात. मात्र, मतदान लोकशाही बळकट करण्याचे माध्यम असल्याने गणेशने मतदानाच्या अधिकाराला महत्त्व देत लांबपल्ल्याचा प्रवास सायकलवरुन पूर्ण केला. पुण्याहून सोनवळा येथे गावी येऊन आपला विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. या प्रवासात त्याने अनेक गावातील शेकडो मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. सायकलवरुन प्रवासाच्या धाडसाबद्दल व अनोख्या जनजागृतीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.




























































