नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थशास्त्रामध्ये नुकतेच नोबेल पुरस्कार पटकावणारे हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी स्वत: या भेटीचा फोटो ट्वीट करून याची माहिती दिली आहे. ‘वैश्विक गरिबी नष्ट करण्यासाठीचा लढा आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर डॉ. अभिजित बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पत्नी एस्थर डफलो आणि मायकल क्रेमर यांना अर्थशास्त्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर डॉ. अभिजित बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. ‘नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यासोबतची भेट शानदार होती. मानवाच्या सशक्तीकरणासाठी त्यांचा उत्साह दिसून आला. यावेळी विविध मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली. आम्हाला त्यांचा गर्व असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा’, असे ट्वीट मोदींनी केले आहे.

मोदींच्या भेटींनंतर बोलताता अभिजित बॅनर्जी यांनी ही भेट खास होती असे म्हटले. मोदींची भेट घेऊन आनंद वाटला, त्यांनी माझ्या भेटीसाठी खूप वेळ दिला. हिंदुस्थानच्या विकासाबाबत आल्या विचारांचे मोदींनी कौतुक केल्याचेही ते म्हणाले. तसेच यावेळी तळागाळातील लोकांच्या समस्या आणि सरकारी तंत्र यावरही चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईत जन्मलेले 58 वर्षीय अभिजित बॅनर्जी यांनी कोलकाता विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर बॅनर्जी अमेरिकेत गेले आणि हॉवर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. अमेरिकेतील प्रसिद्ध मॅसेच्युसेट इन्स्टिटय़ूट आणि टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्यांची पत्नी एस्थर डफलो याही तेथेच अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. बॅनर्जी आणि डफलो हे ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब’चे को-फाऊंडर आहेत. बॅनर्जी, डफलो आणि क्रेमर यांनी वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्यासाठी संशोधन करून उपाययोजना सुचविल्या आहेत.