परळ ‘बेस्ट’ वसाहतीच्या दुरावस्थेमुळे कर्मचारी हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोसळणारे स्लॅब, लिकेज झालेली ड्रेनेज लाइन, मैदानावर वाढलेली झाडेझुडपे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीमधील कर्मचारी हैराण झाले आहेत. या ठिकाणी अनेक वेळा दुर्घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या वसाहतीची तातडीने दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी आज ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.

परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीत सुमारे 1060 कर्मचारी कुटुंबासह राहत आहेत, मात्र अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या वसाहतीची सध्या दुरवस्था झाली असल्याचे अनिल कोकीळ यांनी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. या वसाहतीत लाइटची समस्याही वारंवार निर्माण होत असते.  आवश्यक सुविधा मिळत नसल्याने रहिवासी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरतात, मात्र प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर परळ ‘बेस्ट’ वसाहतीची दुरवस्था सुधारण्यासाठी महाव्यवस्थापकांसह ‘बेस्ट’ समिती सदस्यांनी या ठिकाणी स्पेशल व्हिजिट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी अनिल कोकीळ, आशीष चेंबूरकर यांनी केली. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्रशासनाला दिले.

प्रशासन म्हणते, कामगारच नाहीत!

परळ ‘बेस्ट’ वसाहतीच्या दुरवस्थेबाबत शेकडो तक्रारी दाखल झाल्या असल्याचे अनिल कोकीळ यांनी स्पष्ट केले, मात्र प्रशासनाकडून कर्मचारी नसल्यामुळे काम करता येत नसल्याचे कारण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावर उत्तर देताना महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी कर्मचाऱयांची कमतरता असल्याचे मान्य केले. मात्र या ठिकाणी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुधारणा, दुरुस्तीची कामे करता येतील असा पर्यायही सुचवला. शिवाय या ठिकाणची तातडीने करावयाची कामे लवकरच सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.