चिदंबरम यांना जामीन; पण दिवाळी तुरुंगातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 आयएनएक्स मीडिया लाचप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या जामीन न देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, जामीन मिळूनही ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे चिदंबरम यांचा मुक्कात तुरुंगातच राहणार आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने त्यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. चिदंबरम यांच्यावर सीबीआयने पीटर-इंद्राणी मुखर्जी यांच्याकडून लाच घेतल्याचा तर ईडीने मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत त्यांना 22 ऑगस्टला रात्री अटक केली होती. ते एकाच वेळी सीबीआय आणि ईडीच्या न्यायालयीन कोठडीत होते. चिंदबरम यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका सीबीआय कोठडीतून झाली आहे. पण ते ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत तिहार तुरुंगात असणार आहे.

 कोर्टाने काय म्हटले आहे

आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणात चिदंबरम यांना जामीन द्यावा. ते अन्य आरोपांखाली तुरुंगात नसतील तर त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे. जर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली तर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी नाही. चौकशीसाठी त्यांना संबंधित यंत्रणेसमोर यावे लागेल. या प्रकरणात त्यांनी एक लाख रुपयांचा जामीन भरावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.