
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती तोडून जनता दल यूनायटेडने (जदयू) भाजपसोबत युती केली होती. भाजपसोबत युती केल्यामुळे राजद सत्तेबाहेर फेकली गेली व भाजपचा उपमुख्यमंत्री झाला. भाजप व जदयूची युती जरी झाली असली तरी या दोन पक्षात गेल्या काही दिवसांपासून सारे काही सुरळीत सुरू नाही.
लोकसभा निवडणूकीत जदयू भाजपने युती केली मात्र निकालानंतर जदयूने केंद्रात मंत्री पद नाकारलं होतं. त्यामुळे या दोन पक्षांमधून विस्तव जात नसल्याचे समोर आले होते. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी आता झारखंडमध्ये जदयू व भाजपची युती देखील तुटण्याच्या मार्गावर आहे. झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत जदयू व भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षातील गोटात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरलेले असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून राज्यात जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत जदयू व भाजप कुणाला सोबत घेऊन लढणार हे अद्याप एक कोडेच आहे.
याआधी 2013 ला जदयू ही भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा दावेदार घोषित केले होते. त्यानंतर जदयूचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबतची युती तोडली होती. त्यानंतर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते तर जदयूने राजदसोबत युती केली होती. मात्र ती युती फार काळ टिकली नाही.




























































