
राज्यात पुन्हा आपलीच सत्ता येईल असा विश्वास भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. मात्र नव्या विधानसभेत आपण नसू याबद्दल आयुष्यभर खंत राहील, असेही ते म्हणाले. विधानसभेचे आणि माझे अत्यंत जवळचे नाते होते. मी वारंवार जनतेचे प्रश्न मांडले. आता मी तिथे नसेन याचे दुःख वाटते, असे खडसे म्हणाले.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. भाजपला 140 हून अधिक जागा मिळतील याचा मला विश्वास आहे. राज्यात मजबूत विरोधी पक्ष नसल्याचा आम्हाला निश्चितच फायदाच होईल, पण विधानसभेत जाता आले असते तर आनंद झाला असता. आजवर मी विधानसभेत विरोधी पक्षाचा आमदार म्हणून माझ्या जीवनातील बराच मोठा काळ घालवला. मी जनतेचे अनेक प्रश्न विधानसभेत आक्रमकपणे मांडले. त्यामुळे विधानसभा माझ्यासाठी अत्यंत जवळची राहिली आहे. अनेकदा तर आक्रमकपणे प्रश्न मांडल्याबद्दल मला सभागृहातून निलंबितही करण्यात आले. त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनीही माझ्या आक्रमकपणाचे कौतुक केले होते, अशी आठवणही खडसे यांनी सांगितली. दरम्यान, नव्या विधानसभेत मी नसेन याची खंत मला वाटत असली तरीही नवे लोक इथे येत आहेत याचा मला आनंदच होईल, असेही खडसे म्हणाले.























































