हा महाराष्ट्राचा विजय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंकणे हे महत्त्वाचेच असते. एका मताने जिंकलो किंवा कितीही तरी ते माझ्यासाठी आनंदाचेच आहे. केवळ माझ्या मताधिक्यासाठी काम करीत नव्हतो तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा आणि शिवसेनेचा उमेदवार कसा जिंकेल यासाठीच काम करीत होतो. आज महाराष्ट्र जिंकला आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपली शुभेच्छांची ताकद मला द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.

वरळी विधानसभेतील विक्रमी विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक कर्मचारी, पोलिसांचे त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. ते म्हणाले, मागील नऊ वर्षे काम करीत असताना माध्यम प्रतिनिधींची साथ लाभली. आमदार म्हणून महाराष्ट्राची सेवा करताना जे काही चांगले करतोय ते चांगले म्हणून सांगत जा. त्याचप्रमाणे जिथे चुकत असेन तिथे वेळोवेळी सांगत जा. त्यानुसार त्यात दुरुस्ती असेल ती मी नक्कीच करीन. जे काही चांगले करता येईल ते बिनधास्त सांगा. या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगली कामे करता येतील.

महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूयात
वरळीत जिंकलात मात्र वांद्रय़ातील जागा गेली याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणूक म्हटली की त्यात असे होत असतेच. जिंकणे-हरणे आपल्या हाती नसते तर आपल्या हाती असते ते लोकांचे काम करत राहणे. आपले पाय सदैव जमिनीवर असायला हवेत. ते आम्ही तसेच ठेवू. हा जो विजय झाला आहे तो प्रत्येक शिवसैनिकाचा आहे. राज्यात प्रत्येक पक्षात जे जिंकले आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांनी महाराष्ट्रासाठी काम करूयात.

आमदार म्हणून वेगळे समजू नका
आमदार झालोय म्हणून मला वेगळे काही समजू नका. आदित्य म्हणून मला मित्र समजता, कोणी भाऊ, कोणी मुलगा म्हणून समजत असेल तेच स्थान त्यांनी हृदयात कायम ठेवावे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी राहू देत असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.