सत्तेचा फॉर्म्युला ‘50-50’च हवा, भाजपकडून लेखी हमी घ्या! शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-devendra-meeting

राज्यातील सत्तेचा फॉर्म्युला फिफ्टी-फिफ्टीच हवा आणि तसे भाजपकडून लेखी लिहून घ्या, अशी एकमुखी मागणी आज शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्तास्थापनेचा कौल शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या पारडय़ात टाकला आहे. 105 जागा मिळवून भाजप महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेच्या चाव्या मात्र शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमच्यामध्ये पन्नास-पन्नास टक्के फॉर्म्युल्याची चर्चा झाली होती. सत्तेत 50 टक्के वाटा व शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री देणार असे ठरले होते. शिवसेना या मागणीवर ठाम असून या फॉर्म्युल्याचे लेखी पत्रच भाजपकडून घ्या, अशी मागणी आमदारांनी केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Photo – रश्मी ठाकरे यांनी केले नवनिर्वाचित आमदारांचे औक्षण

आदित्य ठाकरेंकडे नेतृत्व द्या!
आजच्या परिस्थितीत शिवसेनेची मते निर्णायक आहेत. शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आहे. राज्यातील तरुण, महिला व शेतकऱयांचे प्रश्न अशा सर्व प्रश्नांशी समरस होणारे नेतृत्व शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने दिलेले आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहोत, असेही सरनाईक यांनी सांगितले.

सर्वाधिकार पक्षप्रमुखांना
राज्याच्या सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा ठराव सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. या ठरावाला सर्व आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला, अशी माहिती आमदार व शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.

अभिनंदन… स्वागत आणि शुभेच्छा!
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांचे  सौ. रश्मी ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी अभिनंदन केले आणि औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.