
क्यार चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. वादळाचा धोका टळला असला तरी सुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून नुकसान झालेल्या प्रत्येक मच्छीमाराला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देवबाग येथे सांगितले.
चक्रीवादळामुळे मालवण तालुक्याच्या किनारपट्टीस मोठा तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी केसरकर यांनी मालवण शहर बंदर जेटी, दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग सागरी किनारपट्टी व खाडी किनारी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. केसरकर यांनी बंदर जेटी येथे किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या होड्यांचे झालेले नुकसान, होड्या बुडून झालेले नुकसान, दांडी, वायरी भुतनाथ येथील मच्छीमारांचे झालेले नुकसान, देवबाग येथील बंधारा उद्ध्वस्त होऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मच्छिमार व शेतकरी यांच्या पाठीशी ठाम उभे असून नुकसानग्रस्त शेतकरी, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, लोकांच्या जिवाला हानी पोहचू नये यासाठी एनडीआरएफची टीम जिल्ह्यात बोलावून घेण्यात आली होती. वादळाचा धोका आता टळला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काही कर्मचारी दिवाळी सुटीमुळे नाहीत ते दोन दिवसात हजर झाल्यानंतर नुकसानीची सविस्तर आकडेवारी मिळेल. या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही शासनाची भूमिका आहे. या वादळाला तोंड देत असताना नुकसानग्रस्तांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. वाहून गेलेल्या बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. समुद्राचे पाणी विहीरींमध्ये गेल्याने त्या विहिरी साफ करण्याची कार्यवाही करावी लागेल. यादृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाईल.
वादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांची जाळी वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा मच्छीमारांना जाळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याचबरोबर चांदा ते बांदा योजनेतंर्गत जे रापणकर संघ आहेत त्यांना 75 टक्के अनुदानावर जाळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुसळधार पावसामुळे मासळी सुकविणार्या कट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याठिकाणी सोलार ड्रायर्स दिले जाणार आहे. याचा वापर झाल्यास अधिक स्वच्छ मासे व चांगला दर मिळेल. या अनुषंगाने मच्छीमारांची बैठक मालवण किंवा देवबाग येथील पर्यटन विकास महामंडळाच्या केंद्रात लवकरच घेणार आहे. वादळात जे नुकसान झाले ते मागील पूरहानीत जसे नुकसान भरून काढले तसेच भरून काढण्यात येईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले. जनतेच्या पाठीशी ठामपणे राहत लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ. निधी कमी पडणार नाही. असे आश्वासनही श्री. केसरकर यांनी दिले.


























































