महावितरण विभागाच्या कारभारामुळे जसखार गावकऱ्यांची दिवाळी अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

उरण तालुक्यातील नागरिक दीपावलीचा सण साजरा करण्यात मग्न असताना उरण महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका हा जसखार गावातील 150 कुटुंबीयांना बसला आहे. घरात विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज प्रवाहाच्या व्होल्टेजमध्ये अचानक वाढ झाल्याने अनेकांच्या घरातील मीटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या असून दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत येथील रहिवाशांना चाचपडत रात्र जागून काढावी लागली आहे.

या घटनेची माहिती देताना जसखार गावचे सरपंच दामोदर घरत यांनी सांगितले की, उरण महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जसखार गावातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलाव्यात, यासाठी अनेक वेळा मागणी केली. परंतु महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जसखार गावातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलल्या नाहीत. त्यामुळे वारंवार गाव परिसरात दुर्घटना, वारंवार विद्युत पुरवठा खंडित सारख्या घटना घडत आहेत. त्यात रविवारी संध्याकाळी जसखार गावातील रहिवासी दीपावलीनिमित्त लक्ष्मी पूजन सोहळा साजरा करण्यासाठी मग्न असताना अचानक गावातील महावितरण विभागाच्या विद्युत वाहक तारांनी पेट घेतला.

या घटनेमुळे घरातील विद्युत पुरवठा करणारे मीटर ,घरातील इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्याची दुर्दैवी घटना घडली. रहिवाशांना आपल्या घरात काय घडते या भीतीने रहिवासी सैरभैर पळू लागले. परंतु काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे. महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दीपावलीसारख्या मंगल प्रसंगी 150 कुटुंबीयांच्या घरातील मीटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्याने मोठ्या प्रमाणात येथील रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच रहिवाशांना दिपावली या सणासुदीच्या दिवसांत रात्रभर जागून काढावी लागली आहे.

या घटनेची माहिती उरण महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्याना दिली. परंतु महावितरण विभागाचे कर्मचारी उशिराने गावात आल्याने सध्या रहिवाशांमध्ये महावितरण विभागाच्या कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे. सरपंच दामोदर घरत यांनी  या घटनेसंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रहिवाशांच्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीने रहिवाशांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीने सरपंच दामोदर घरत यांनी केली आहे. या घटने संदर्भात महावितरण विभागाच्याकडे विचारणा केली असता काम सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे.