महिला खासदाराचे न्यूड फोटो लिक; दिला राजीनामा…वाचा सविस्तर….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूड फोटो लिक झाल्यानंतर एका महिला खासदाराने अमेरिकी सिनेटच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कॅलिफोर्नियातील 32 वर्षांच्या खासदार केटी हिल यांचे नुकतेच न्यूड फोटो लिक झाले होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपण पदावर राहिल्यास यापुढे आणखी कोणत्या घटनांना सामोरे जावे लागेल, याची भीती वाटत असल्याने आपण पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संसदेतील एका पुरुष सहकाऱ्याशी आणि कार्यालयातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केटी यांच्यावर आहे. त्यातील काही फोटो सोशल मीडियावर लिक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

केटी यांच्यावर झालेल्या आरोपांची संसदेच्या एथिक्स समितीकडून चौकशी सुरू आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये त्या निवडून आल्या होत्या. या घटनेनंतर आणखी पुढे काय होईल याची मनात भीती असल्याने आपण पद सोडत असल्याचे त्यांनी नमूद करत ट्विटरवरही आपले राजीनामापत्र पोस्ट केले आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा सुरू असल्याने त्यांनी कार्यालायातील कर्मचाऱ्याशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. मात्र, कार्यालयात आपण कोणतेही अनुचित वर्तन केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याची जाण आपल्याला आहे, असेही केटी यांनी समितीला सांगितले आहे. केटी आणि त्यांच्या पतीच्या घटस्फोटाची प्रक्रियाही न्यायालयात सुरू आहे. आपल्याकडून चूक झाली असून आपण ती मान्य करतो. मात्र, आपली बदनामी करण्यासाठी राजकीय कँपेन चालवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपल्या खासगी जीवनात हस्तक्षेप करून खासगी जीवनातील आपले काही फोटो व्हायरल करण्यात आले. खासगी संबंधातील असे फोटो व्हायरल करणे बेकायदा आहे. हे फोटो लिक करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे महिला खासदाराचे न्यूड फोटो लिक कसे झाले आणि यामागे केटी यांच्या बदनामीचे षडयंत्र आहे काय, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.