
उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ अलेक्स याला अटक करून सुमारे तीन कोटींचे ड्रग्स जप्त केले. यात कोकेन, एमडीएमए, अँफेटॅमिन, चरस, गांजा व रोख 2 लाख रूपयांचा समावेश आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सीमेर-कांदोळी येथे संशयित राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत कळंगुट पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ अलेक्स ( वय 34) याला अटक करून त्याच्याकडून 1.021 किलो कोकेन, 2.035 किलो एमडीएमए, 760 ग्रॅम अँफेटॅमिन, 106 ग्रॅम चरस, 1.170 किलो गांजासह रोख 2 लाख जप्त केले. हस्तगत केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 3 कोटी आहे. अलेक्सवर गुन्हा नोंदवून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी 2011 मध्ये संशयिताला राज्यात अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच 2012 मध्ये कळंगुट पोलिसांनी कोकेनप्रकरणात त्याला अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मलीक, पोलीस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शंशाक साखळकर, महाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मीतल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद फटनिक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर, शैलेश गडेकर यांनी यात भाग घेतला. पुढील तपास पोलीस अधीक्षक उत्किृष्ट प्रसून, पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस करीत आहेत. गेल्या आठवडयात 19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री कळंगुट व साळगाव पोलिसांनी पाठलाग करून तीन नायजेरियन नागरिकांना 1.54 लाखाच्या अमली पदार्थांच्या मुद्देमालसह अटक केली होती. सुमारे 12 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी संशयितांना साळगाव येथे अटक केली. यात दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले. यामध्ये किनारी पट्ट्यातील कुख्यात ड्रग डिलर मायकल ओकाफोर याला अटक केली होती.































































