
‘बेस्ट’च्या सर्व 32 हजार कर्मचाऱयांना आजपासून त्यांच्या हक्काचा बोनस मिळणार आहे. ‘बेस्ट’ कर्मचाऱयांना देण्यात येणाऱया सानुग्रह अनुदानाबाबतच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यासाठी आज भाऊबीज सुट्टीच्या दिवशी ‘बेस्ट’ची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी समितीने प्रस्तावाला मंजुरी देताच कर्मचाऱयांच्या खात्यावर पुढील 48 तासांत 9100 रुपये जमा होतील असे आश्वासन महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले.
‘बेस्ट’ प्रशासनाने वेतनाबाबतच्या सामंजस्य करारावर सही करणाऱया कर्मचाऱयांनाच दिवाळीत सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे करारावर स्वाक्षरी न करणाऱया इतर कर्मचाऱयांचे नुकसान होणार होते. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’ प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात कर्मचारी औद्योगिक न्यायालयात गेले होते. यावेळी औद्योगिक न्यायालयाने सरसकट सर्वच कर्मचाऱयांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले होते. मात्र औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानंतरही ‘बेस्ट’ प्रशासनाने उच्च न्यायालयात जात सामंजस्य करारावर सही न करणाऱया कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देता येणार नाही अशी भूमिका मांडली होती. मात्र उच्च न्यायालयात सट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सर्व कर्मचाऱयांना बोनस देण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱयांना तातडीने त्यांच्या हक्काचा बोनस मिळावा यासाठी भाऊबीजच्या सुट्टीच्या दिवशी ‘बेस्ट’ समितीची विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. ‘बेस्ट’ कर्मचाऱयांना बोनस मिळण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे शिवसेना सदस्य आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, सुहास सामंत आदींनी स्वागत केले.
…म्हणूनच रखडला बोनस
सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ‘बेस्ट’ प्रशासनाने 10 सप्टेंबरलाच तयार केला. 21 सप्टेंबरला ‘बेस्ट’ समिती बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला, मात्र 22 सप्टेंबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेच्या फेऱयात सानुग्रह अनुदान अडकले होते. त्यामुळे आचारसंहिता संपताच कर्मचाऱयांना लवकरात लवकर हक्काचा बोनस मिळावा म्हणून सुट्टीच्या दिवशी बोनसचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
37 कोटींचा भार पडणार
‘बेस्ट’च्या वाहतूक आणि इलेक्ट्रिक विभागातील 32 हजारांवर कर्मचाऱयांना 9100 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यामुळे ‘बेस्ट’वर 37 कोटींचा भार पडणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱयांना बोनस देण्यात आला नव्हता. तर 2017 मध्ये कर्मचाऱयांना 5000 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र या वर्षी समाधानकारक बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



























































